नवी मुंबई :- पामबीच मार्गावर किल्ले गावठाण परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या नवी मुंबई महापालिका मुख्यालयात कामकाजास सुरूवात करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे रितीरिवाजानुसार प्रथम पुजन करण्याची लेखी मागणी नवी मुंबईतील शिवसेनेचे युवा नेते व भारतीय विद्यार्थी सेनेचे नवी मुंबई संघठक सोमनाथ वास्कर यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनातून केली आहे.
महापालिकेच्या जुन्या सभागृहात महासभा अथवा अन्य सभांदरम्यानच्या कामकाजास सुरूवात करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करूनच कामकाजाला सुरूवात होत असे. मार्च महिन्यात नवीन मुख्यालयात महापालिका प्रशासनाच्या कारभारास सुरूवात झाल्यापासून प्रशासनाला छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर पडलेला पहावयास मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत असून महाराष्ट्राचे अस्मितेचे प्रतिक असल्याचे सोमनाथ वास्कर यांनी निवेदनात म्हटले आहे.
महापालिका सभागृहात छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कामकाज सुरू करण्याची प्रथा खंडीत न करता पूर्ववत करण्याची मागणी वासकर यांनी केली आहे.