* नामदार गणेश नाईक आणि आमदार संदीप नाईक यांचा विश्वास * अपूर्व उत्साह आणि जल्लोषात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल
अनुराग वैद्य
नवी मुंबई : कार्यकर्तेे आणि नागरिकांचा अपूर्व उत्साह आणि जल्लोषाच्या वातावरणात गुरूवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने बेलापूर विधानसभा मतदारसंघासाठी नामदार गणेश नाईक आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघासाठी आमदार संदीप नाईक यांनी आपापले उमेदवारीअर्ज दाखल केले. उमेदवारीअर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपण सर्वांनी मिळून नवी मुंबईचा विकास केला आहे. या विकासाच्या मुद्यावरच आपण या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, विकासाच्या बाजूनेच जनता कौल देईल, असे प्रतिपादन नामदार गणेश नाईक आणि आमदार संदीप नाईक यांनी केले.
‘विकासासाठी राष्ट्रवादी ’, ‘नवी मुंबईचा विकास हाच आमचा ध्यास’ अशा प्रकारच्या घोषणांनी बेलापूर आणि ऐरोली परिसर दुमदुमून गेला होता. अतिशय शिस्तबध्द पध्दतीने वाजतगाजत निघालेल्या मिरवणुकीसह आपापल्या मतदारसंघातील निवडणूक कार्यालयांमध्ये दोन्ही उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. दोन्ही ठिकाणी संपूर्ण परिसर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फुलला होता. महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक, सर्वधर्मिय सर्व प्रांतीय नवी मुंबईकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बेलापूरमध्ये दुपारी दीड वाजता कल्पना जगताप-भोसले आणि ऐरोलीमध्ये दुपारी बारा वाजता विरकर या निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे अर्ज सादर करण्यात आले.
अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नामदार गणेश नाईक म्हणाले की, आम्ही नवी मुंबईचा सर्वांगीण विकास केला आहे. ठाणे आणि मुंबई महापलिकांमधील विरोधी पक्षातील सत्ताधार्यांना जो विकास करण्यास जमला नाही तो विकास आम्ही नवी मुंबईमध्ये केला आहे. २४ तास पाणीपुरवठा, दळणवळणाच्या सोयीसुविधा, आधुनिक शैक्षणिक सुविधा, आरोग्याच्या सोयी, औद्योगिक क्षेत्राचा विकास, मलःनिस्सारण व्यवस्था अशा सर्व आघाडयांवर नवी मुंबईने लगतच्या महापालिकांना केव्हाच मागे टाकले आहे. शहराचा विकास करीत असताना राजकीय स्वार्थापोटी विकास
कामांमध्ये काही प्रवृत्तींनी खो घालण्याचाही प्रयत्न केला असे सांगून नामदार नाईक म्हणाले की, या समाजविघातक प्रवृत्तींना जनतेनेच नाकारुन त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. त्यामुळेच मागील चार टर्म या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी जनतेने आम्हाला दिली आहे, असे ते म्हणाले.
नामदार नाईक पुढे म्हणाले की, माझ्यासह आमदार संदीप नाईक यांच्यावरही जनतेने विश्वास व्यक्त करुन त्यांना २००९मध्ये जिंकून दिले. यापूर्वी आमच्यावर व्यक्त केलेला विश्वास यावेळेस देखील जनता दाखवेल आणि विक्रमी मताधिक्क्यांनी आम्हाला विजयी करेल, असा विश्वास नामदार नाईक यांनी व्यक्त केला.
आमदार संदीप नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, नामदार गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून सर्व घटकांना सोबत घेवून विकास साधला आहे. नागरी सुविधा, दळणवळण, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, वैशिष्टयपूर्ण प्रकल्प अशा सर्वच विषयात नवी मुंबई शहर इतर शहरांच्या तुलनेत आघाडीवर
आहे. सामाजिक कार्ये मोठया प्रमाणावर झालेली आहेत. मतदारसंघाचा सर्वागीण विकास साधला आहे. त्यामुळे नवी मुंबईची सुज्ञ जनता विकासाच्या बाजूनेच कौल देईल, असा दुर्दम्य विश्वास आमदार संदीप नाईक यांनी व्यक्त केला. नवी मुंबईकरांचे जिव्हाळयाचे प्रश्न निरंतर पाठपुरावा करुन सोडविण्यात यश आले याचे मला समाधान आहे,असे आमदार संदीप नाईक यांनी सांगितले. नवी मुंबईसाठी त्याग केलेल्या आमच्या प्रकल्पग्रस्त बांधवांनी गरजेपोटी केलेल्या निवासी आणि वाणिज्यिक बांधकामांना संरक्षण आम्ही मिळवून देवू शकलो. सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा विषय मार्गी लागला आहे. एसआरए अंतर्गत झोपडपटटयांचा पुनर्विकास होणार आहे. असे नमूद करुन गेल्या पाच वर्षात ऐरोली मतदारसंघात अनेक भरीव विकासकामे झाली आहेत. गावठाण आणि नोड भागात आवश्यक नागरी सुविधांची पुर्तता करीत असताना मतदारसंघाच्या विकासाचे दूरगामी धोरण डोळयासमोर ठेवले. यामधून उडडाणपूल, रस्ते, स्कायवॉक अशा
पायाभूत सुविधा निर्माण केल्या. विद्युत पुरवठा व्यवस्थेचे नुतनीकरण करुन घेतले. ऐरोली मतदारसंघासाठी स्वतंत्र नाटयगृह मंजुर करुन घेतले. घनसोली येथे सेंट्रल पार्क मंजुर करुन घेतले. माथाडी बांधवांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.
घनसोली नोडमध्ये विकासकामांसाठी मोठा निधी मंजुर करुन घेतला आहे. आमदार म्हणून विकासाची कामे करीत असताना अनेक विधायक उपक्रम सातत्याने राबविले. बेरोजगार युवावर्गाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या. शिक्षणविषयक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविली. शासकीय कामांसाठी आवश्यक दाखले एकाच छताखाली उपलब्ध करुन दिले. क्रीडा महोत्सवांचे आयोजन करुन स्थानिक खेळाडूंना एक भव्य व्यासपिठ निर्माण करुन दिले. या उपक्रमांमधून आपल्या मतदारसंघातील विद्यार्थ्यांची निकालाची टक्केवारी वाढली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण झाले. विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन प्रवेश सुकर झाले. समाजातील सर्व घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न मागील पाच वर्षात केला आहे, अशी भावना आमदार नाईक यांनी व्यक्त केली. मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्याठी विधानसभेच्या कामकाजात १००टक्के उपस्थिती लावली, असेही त्यांनी सांगितले.
दोन्ही ठिकाणी उमदेवारीअर्ज दाखल करतेप्रसंगी राष्ट्रवादी कॉंगे्रसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक, ज्येष्ठ समाजसेवक ज्ञानेश्वर नाईक, महापौर सागर नाईक, कामगारनेते अशोक पोहेकर, राष्ट्रवादीचे शहरअध्यक्ष गोपिनाथ ठाकूर, महिला अध्यक्षा कमलताई पाटील, युवक अध्यक्ष जयेश कोंडे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.