नवी मुंबई : विधानसभा निवडणूकीकरीता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शनिवार हा अंतिम दिवस असून बेलापुर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्यावतीने विजय नाहटा आणि मनसेकडून गजानन काळे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
शिवसेना उपनेते आणि माजी कोकण आयुक्त विजय नाहटा यांना बेलापूर विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेची उमेदवारी मिळाली असून ते शनिवारी सकाळी ११ वाजता आपला उमेदवारी अर्ज सीबीडी येथील कोकण भवनमधील निवडणूक कार्यालयात भरणार आहेत.
अर्ज भरण्यापुर्वी शिवसेनेचे पदाधिकारी आणि हजारो शिवसैनिक जुन्या महापालिका मुख्यालयाजवळ जमणार असून तेथून मिरवणुकीने कोकण भवन येथे जाणार आहेत. याप्रसंगी ठाणे जिल्हासंपर्कप्रमुख आमदार एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख विजय चौगुले, संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख मनोहर गायखे, के. एन. म्हात्रे, जिल्हासंघटक रंजना शिंत्रे, शहरप्रमुख विजय माने, जिल्हा युवाधिकारी वैभव नाईक, विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील, माजी पक्षप्रतोद रतन नामदेव मांडवे, भाविसेचे जिल्हासंघटक सोमनाथ वास्कर, उपशहरप्रमुख गणपत शेलार, रोहिदास पाटील, प्रकाश पाटील, संतोष घोसाळकर, प्रफफुल म्हात्रे, विशाल कोळी, प्रशांत तांडेल, मनोज इसवे आदी उपस्थित राहणार आहेत.
मनसेचे शहरअध्यक्ष गजानन काळे हेदेखील सकाळीच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी मनसेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. मनसेचे शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी, महिला कार्यकारिणीतील पदाधिकारी, शाखाध्यक्ष, मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. बेलापुरमधील के-स्टार हॉटेलपासून वाजतगाजत रॅली काढून मनसेच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे शहरउपाध्यक्ष धीरज भोईर यांनी दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ऐरोली विधानसभेकरीता मनसेचे नवी मुंबई शहर उपाध्यक्ष गजानन खबाले यांना उमेदवारी जाहीर झाली असून ते शनिवारी सकाळी ११ वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मनसेचे सचिव संदीप गलुगडे यांनी दिली.