अनुराग वैद्य
नवी मुंबई : शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस भरण्याचा दिवस असतानाच नवी मुंबईतील ऐरोली व बेलापुर मतदारसंघात नाट्यमय घडामोडी घडल्या.ऐरोली मतदारसंघात शिवसेनेच्या मातब्बर इच्छूकाने अखेरच्या क्षणी भाजपातून उमेदवारी अर्ज दाखल केला तर बेलापुर मतदारसंघात पक्षसुप्रिमोने आपल्याला विश्वासात न घेता शहर अध्यक्ष गजानन काळेंना उमेदवारी दिल्याचा संताप व्यक्त करत मनसे व मनविसेच्या आजी-माजी पदाधिकार्यांनी पक्षाचे राजीनामे दिल्याने मनसेला काही प्रमाणात खिंडार पडले आहे.
ऐरोली मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले आणि युवा सेनेचे अध्यक्ष वैभव नाईक यांच्यात कमालीची चुरस होती. अखेरच्या क्षणापर्यत आपल्याच नेत्याला उमेदवारी दिल्याचा दावा नाईक आणि चौगुले समर्थकांकडून केला जात होता. पक्षाने जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांना उमेदवारी दिल्यावर युवा सेनेचे अध्यक्ष वैभव नाईक यांनी थेट भाजपातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेनेत खळबळ उडाली.
मनसेने बेलापुर मतदारसंघातून शहर अध्यक्ष गजानन काळे यांना उमेदवारी दिली. काळे यांनी शनिवारी सकाळी सात-आठ फूट जंगली गवतातून वाट काढत, चिखल तुडवित पामबीच मार्गावरून सुमारे दीड किलोमीटर खाडीअर्ंतगत भागात नवी मुंबईतील आगरी-कोळी ग्रामस्थांचे श्रध्दास्थान असणार्या बामणदेवाचे दर्शन घेवून आपला उमेदवारी अर्ज बेलापुरला जावून दाखल केला. मनसेचे प्रथम शहरअध्यक्ष व माजी नगरसेवक जितेंद्र कांबळी, मनविसेचे शहर अध्यक्ष शिरीष पाटील, मनविसे सांस्कृतिक विभागाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विवेक सुतार, घणसोलीचे माजी विभाग कृष्णा पाटील, दत्ता घंगाळे, संजय पवार, अविनाश सुतार, अकुंश सानप, जयेश म्हात्रे, सागर नाईक, सुरेश ठाकूर, संदीप ताईगडे, सचिन सुराडकर, गणेश पाटील आदी पदाधिकार्यांनी पदाचे राजीनामे दादर मनसेच्या मुख्यालयात पाठवून दिले. त्यानंतर पत्रकार परिषद घेवून पक्षाने उमेदवारी देताना विश्वासात घेतले नसल्याचे सांगत आपला संताप व्यक्त केला. नाराजांनी आपला राज ठाकरेंवर तसेच आदित्य शिरोडकरांवर राग नसला तरी गजानन काळेंचे आपण काम कदापि करणार नसल्याचे सांगितले.