अनुराग वैद्य
नवी मुंबई : बेलापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शिवसेना उपनेते, माजी आयएएस अधिकारी विजय नाहटा आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी आपले उमेदवारी अर्ज शनिवारी भव्य मिरवणुकातून जाऊन भरले. भगव्या टोप्या, भगवे उपारणे, भगवे झेंडे आणि जय शिवाजी जय भवानी या गगणभेदी घोषणा यामुळे बेलापूर आणि ऐरोली मधील वातावरणात भगवा जल्लोष संचारला.
जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी आज सकाळी ११ च्या सुमारास ऐरोली येथील निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापुर्वी भव्य मिरवणूक काढण्यात आली. हजारो शिवसैनिक या मिरवणुकीत सहभागी झाले. याप्रसंगी खासदार राजन विचारे, उपजिल्हाप्रमुख भोलानाथ तुरे, शहरप्रमुख सुरेश म्हात्रे, उपशहरप्रमुख बंडु पाटील, विलास म्हात्रे, नगरसेवक विजयानंद माने, मनोज हळदणकर, राजु पाटील, सुरेखा पाटील, लता कोटकर आदी उपस्थित होते.
शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी शनिवारी सीबीडी बेलापूर येथील निवडणूक कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापुर्वी जुन्या महापालिका मुख्यालयापासून भव्य मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीत संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे, के. एन. म्हात्रे, जिल्हासंघटक रंजना शिंत्रे, शहरप्रमुख विजय माने, विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील, माजी पक्षप्रतोद रतन मांडवे , उपशहरप्रमुख गणपत शेलार, प्रकाश पाटील रोहिदास पाटील, संतोष घोसाळकर, काशिनाथ पवार, शहरसंघटक रोहिणी भोईर, नगरसेवक दिलीप घोडेकर, सतिश रामाणे, श्रीकांत भोईर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.