अनुराग वैद्य
नवी मुंबई : ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई कार्यक्षेत्रात मोडणार्या बेलापुर मतदारसंघातील लढतीकडे सध्या राज्यातील धुरीणांचे लक्ष लागून राहीले आहे. स्थानिक पातळीवरील सर्वच मातब्बर निवडणूक रिंगणात सहभागी झाल्याने अटीतटीच्या लढतीत कोण जिंकणार अन् कोण हरणार याबाबत अंदाज वर्तविणे राजकीय समीक्षकांनाही अवघड होवून बसले आहे. बेलापुरमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार ना. गणेश नाईक यांना बेलापुरचा गढ जिंकण्यासाठी एकाहून अधिक मातब्बरांचा सामना करावा लागणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने बेलापुरमधून ना. गणेश नाईक यांना निवडणूक रिंगणात उतरविले असून भाजपानेदेखील आक्रमक नेत्या सौ. मंदाताई म्हात्रे यांना निवडणूक रिंगणात उतरवून गांभीर्याने आपणही निवडणूकीला सामोरे जात असल्याचा संदेश दिला आहे. शिवसेनेने माजी आयएसआय अधिकारी विजय नाहटा यांना उमेदवारी देत सुशिक्षितांना, जैन धर्मियांना व उच्च विद्याविभूषित नवी मुंबईकरांना आकर्षित करण्याचा प्रयास केला असून नवी मुंबईतील मराठी टक्क्याचा कल अलिकडच्या काळात शिवसेनेकडे झूकू लागला आहे. मनसेने नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांना बेलापुर लढण्याचे आदेश देवून बेलापुरचा विषय प्रतिष्ठेचा केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिडको संचालक नामदेव भगत हे शनिवारी सकाळी आपला उमेदवारी अर्ज कॉंग्रेस पक्षाकडून भरणार आहेत. गतवेळी नामदेव भगतांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवित १३ हजाराच्या आसपास मतदान घेतले होते. आता तर ते अधिकृत कॉंग्रेसच्या पंजावरच निवडणूक लढवित असल्याने बेलापुर जिंकण्याचाच निर्धार कॉंग्रेसी घटकांकडून व्यक्त केला जात आहे.
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत असल्याने त्यांच्या समस्यानिवारणासाठी सातत्याने लढा देणारे डॉ. राजेश पाटीलदेखील प्रकल्पग्रस्त आघाडीकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भाजपा,कॉंग्रेस, मनसे, प्रकल्पग्रस्त आघाडी सर्वांनीच तगडे उमेदवार बेलापुरच्या निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. नवी मुंबई महापालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणूकदेखील एप्रिल २०१५ मध्ये होत असल्याने विधानसभेच्यानिमित्ताने पालिकेसाठीदेखील प्रभागाप्रभागातील जनाधार आजमावण्याची ही संधी असल्याने बेलापुरची जागा सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केल्याचे पहावयास मिळत आहे. पालिकेतील भ्रष्टाचार, स्थानिक उमेदवार, केलेली विकासकामे यासह स्थानिक समस्यांदेखील प्रचारात महत्वाची भूमिका बजावणार आहेत.a