अनुराग वैद्य
नवी मुंबई : ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपा, शिवसेना, मनसेने मातब्बर उमेदवार रिंगणात उभे केले असले तरी मनसेचे उमेदवार किती मते घेतात आणि कोणाला किती त्रासदायक ठरतात, याकडे ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे लक्ष लागून राहीले आहे.
ऐरोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसने विद्यमान युवा आमदार संदीप नाईक यांनाच पुन्हा निवडणूक रिंगणात उतरविले असून कॉंग्रेसने नवी मुंबईचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, शिवसेनेने नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले, भाजपाने वैभव नाईक आणि मनसेने गजानन खबालेंना उमेदवारी दिली आहे.
मनसेच्या गजाजन खबालेंची उमेदवारी ऐरोली-घणसोली कॉलनीत शिवसेनेला तर कोपरखैराणेत भाजपा-एनसीपीला त्रासदायक ठरणार असल्याचा दावा मनसेचे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी केला आहे. ऐरोलीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेमध्ये वर्चस्वासाठी काट्याची टक्कर होत असून शहर उपाध्यक्ष निलेश बाणखिले, शहर सचिव दत्तात्रय सुर्यवंशी तसेच रूपेश कदमसारख्या मातब्बर कार्यकर्त्याचा करिश्मा शिवसेना-राष्ट्रवादीचा जनाधार काही प्रमाणात मनसेकडे वळविण्याची शक्यता आहे.
घणसोली कॉलनीने पालिका निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संजय पाटील यांना साथ दिली असली तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत घणसोली कॉलनीने शिवसेनेच्या भगव्यालाच आपली साथ दिलेली आहे. वैभव नाईक भाजपामध्ये गेले असले तरी घणसोली कॉलनीच्या शिवसेनेच्या गडाला भगदाड पाडणे वैभव नाईकांना पर्यायाने भाजपाला शक्य होणार नाही. घणसोली कॉलनीमध्ये सांगलीवासियांची संख्या लक्षणीय आहे. गतपालिका निवडणूकीत मनसेच्या कृष्णा पाटील यांनी हजाराहून अधिक मतदान घेतले होते. खबालेंच्या उमेदवारीने सांगलीवासियांना आपला हक्काचा उमेदवार मिळाल्याने सांगलीकर मनसेच्या खबालेंनाच पहिली पसंती देणार असल्याचा आशावाद मनसेच्या संदीप गलुगडे यांनी व्यक्त केला आहे.
कोपरखैराणेत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपात कमालीची चुरस असून खबाले हे कौपरखैराणेचे स्थानिक असून सामाजिक माध्यमातून तसेच बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून कोपरखैराणेत खबालेंचा दांडगा जनसंपर्क आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस,कॉंग्रेस, शिवसेना, भाजपा उमेदवारांप्रमाणे मनसेचे गजानन खबालेंदेखील व्हिटॉमिन एममध्येही मातब्बर असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांना इतरत्र धावाधाव करावी लागणार नाही. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी फोडणे इतर पक्षांना शक्य होणे अवघड होणार नसल्याने मनसेचे खबाले निवडणूक रिंगणात सर्वच मातब्बरांना त्रासदायक होवून बसल्याचे प्रचार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात पहावयास मिळत आहे.