नवी मुंबईत भाजपाला जबर धक्का!
सुजित शिंदे
नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाला जबरदस्त खिंडार पडले असून बेलापूर येथे राहणारे पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण लक्ष्मण मुकादम यांनी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉंगे्रसमध्ये प्रवेश केला आहे.
वाशीतील नवी मुंबई स्पोर्टस असोसिएशनच्या सभागृहात अलिकडेच झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात लोकनेते गणेश नाईक यांनी मुकादम यांचे राष्ट्रवादी कॉंगे्रसमध्ये स्वागत केले.
नारायण मुकादम हे भारतीय जनता पक्षाचे जुने-जानते कार्यकर्ते असून गेली ३० ते ३५ वर्षे जनसंघापासून ते पक्षासाठी काम करीत होते. परंतु राजकीय स्वार्थापोटी निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या काही व्यक्तींनी पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यास सुरुवात केली. पक्षासाठी खस्ता खालेल्या कार्यकर्त्यांची व्यक्तीगत कुचंबना होवू लागली आहे, असा आरोप श्री. मुकादम यांनी केला आहे. ही बाब पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या कानावर वारंवार घालूनही त्याकडे कधीच गांभिर्याने पाहिले गेले नाही. पक्षाच्या निर्णयप्रक्रीयेत ज्येष्ठ कार्यकर्त्यांना डावलण्यात येत असल्याची खंत श्री मुकादम यांनी व्यक्त केली आहे.
भाजपामध्ये गटा-तटाचे राजकारण वाढले असून हा पक्ष नेतृत्वहिन झाल्याची टिका मुकादम यांनी केली आहे. लोकनेते गणेश नाईक यांच्या विकासाभिमूख नेतृत्वामुळे राष्ट्रवादी कॉंगे्रमध्ये प्रवेश केल्याची माहिती श्री मुकादम यांनी दिली. गणेश नाईक हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जो मान-सन्मान देतात तसेच त्यांच्या हितासाठी जे कष्ट घेतात ते अतुलनीय असल्याचे गौरवोदगार श्री मुकादम यांनी काढले.
सर्वसामान्यांच्या उध्दारासाठी अविरत कार्य करणार्या लोकनेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली कोणत्याही पदाची अपेक्षा न करता काम करणार असल्याची प्रतिक्रीया श्री मुकादम यांनी दिली.