सुजित शिंदे
नवी मुंबई : बेलापुर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विजय नाहटा यांनी आपल्या प्रचार अभियानात गती घेतली असून मंगळवारी सानपाडा गाव व सभोवतालच्या परिसरात विजय नाहटा यांचे मतदारांकडून उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले.
सानपाडा गाव व सभोवतालचा परिसर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून गेली १० वर्षे या परिसरातून शिवसेनेचा नगरसेवक विजयी होत आहे. शिवसेनेचे स्थानिक पातळीवर युवा नेतृत्व व भाविसेचे नवी मुंबई संघठक सोमनाथ वासकर आणि नगरसेविका सौ.कोमल वासकर यांच्यामागे या परिसरात कमालीचा जनाधार असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत या परिसरातून शिवसेनेला दणदणीत आघाडी मिळाली होती.
शिवसेना उमेदवार विजय नाहटा यांनी आपल्या प्रचार अभियानात प्रत्यक्ष जनसंपर्कावर भर दिला आहे. सोमवारी वाशी विभाग नाहटा यांनी पदयात्रेतून पिंजून काढला. व्यापारी व रहीवाशांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले होते. मंगळवारी सानपाड्यात शिवसेनेच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन झाल्यावर नाहटा यांनी सानपाडा गाव व सभोवतालच्या परिसरात पदयात्रेतून जनसंपर्क केला. यावेळी सोमनाथ वासकर व शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी त्यांच्या समवेत सहभागी झाले होते. ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे ओवाळून स्वागत केले. रहीवाशांनीदेखील उत्स्फुर्तपणे जवळीक साधत नाहटांशी चर्चा केली. सोमवारी वाशी आणि मंगळवारी सानपाडा पिंजून काढणार्या नाहटांच्या चौकसभांकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागून राहीले आहे.