सुजित शिंदे
नवी मुंबई : ठाणे जिल्ह्याचेच नाही तर उभ्या महाराष्ट्राचे बेलापुर विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष लागून राहीले आहे. प्रस्थापित राष्ट्रवादी कॉंग्रेससह, शिवसेना, कॉंग्रेस, मनसे आणि भाजपानेदेखील निवडणूक रिंगणात आपले मातब्बर उमेदवार उतरविले आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात शिवसेना आणि मनसेने कोणाचाही पक्ष न फोडण्याच्या भानगडीन न पडता थेट जनसंपर्क अभियानावर भर दिल्याने प्रचारात शिवसेना-मनसेचाच सध्या तरी सहभाग पहावयास मिळत आहे.
शिवसेनेने जैन समाजाच्या विजय नाहटा या माजी सनदी अधिकार्याला (आयएएस) अधिकार्याला निवडणूक रिंगणात उतरवून राजकारणात उच्चविद्याविभूषित तसेच साक्षरांचे लक्ष आकर्षित करण्याचा प्रयास केला आहे. विजय नाहटा यांच्या माध्यमातून जैन समाजाला आपल्याकडे खेचून घेण्यामध्ये शिवसेनेला प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात यश आले आहे. नाहटा यांनी शहरप्रमुख विजय माने व ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल मोरे आणि अन्य संघटनात्मक पदाधिकारी व नगरसेवकांच्या माध्यमातून नियोजनात्मक प्रचाराचा धुराळा उडविल्याचे दिसून येते. सोमवारी वाशी परिसर, मंगळवारी सानपाडा परिसर व रात्री शिवसेनेच्या शाखांना, नवरात्रौत्सवांना भेटी अशा स्वरूपात प्रत्यक्षात पदयात्रेतून जनसंपर्क अभियानावर भर दिला आहे. बुधवारी पुन्हा एकवार शिवसेनेचे विजय नाहटा नेरूळ परिसर पिंजून काढताना शिवसेनेच्या शाखांना भेटी देवून जनसंपर्कावर भर देणार आहेत. लोकसभा निवडणूकीत शिवसेनेच्या प्रचारात चौकसभांनी महत्वाची भूमिका बजावल्याने विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या चौकसभांची शिवसैनिक आतुरतेने वाट पहात असल्याचे पहावयास मिळते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील शहर अध्यक्ष गजानन काळेंना निवडणूक लढतीत उतरवून बेलापुर मतदारसंघ प्रतिष्ठेचा विषय केला आहे. पामबीच मार्गावर सारसोळे खाडीअर्ंतगत भागात चिखल तुडवित, सहा ते आठ फूटी जंगली गवतातून वाटचाल करत ग्रामस्थांचे श्रध्दास्थान असणार्या बामणदेवाचे दर्शन घेवूनच उमेदवारी अर्ज भरणार्या गजानन काळे ग्रामस्थांचे लक्ष वेधण्यात यशस्वी झाले आहेत. रविवारी नेरूळमधील देवाडीगा हॉलमध्ये मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता मनसे संपली नसल्याचा संदेश नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळाला गेला आहे. आंदोलन करणारा, चळवळीने संघटनात्मक बांधणी करणार्या आपल्यातील ३५ वर्षीय उमद्या गजानन काळेंेना उमेदवारी मिळाल्याने मनसेचा युवा वर्ग प्रचारात कमालीचा सक्रिय झाला आहे. सोमवारी तुर्भे आणि मंगळवारी वाशी परिसर गजानन काळेंनी पिंजून काढला. बुधवारी गजानन काळे नेरूळमधील विभागाविभागात जनसंपर्कावर भर देणार आहेत.
शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारांकडून पदयात्रा व प्रत्यक्ष भेटीगाठीच्या अभियानावर भर देण्यात येत असून बुधवारी नेरूळमध्ये शिवसेना-मनसेच्या प्रचाराचा धुराळा उडताना पहावयास मिळणार आहे. नेरूळला सेक्टर १० परिसरात गजानन काळे फिरणार असून मनसे वर्तुळात हा परिसर अमर पाटील, अर्जुन चव्हाण, अजय सुपेकरचा परिसर म्हणून ओळखला जातो. नेरूळ अभियानात शिवसेनेचे विजय नाहटा नेरूळ सेक्टर सहा परिसरातील शिवसेना शाखेला भेट देणार असून शाखाप्रमुख विरेंद्र लगाडे आणि शिवसैनिकांचा उत्साह वाढविणार आहेत.