सुजित शिंदे
नवी मुंबई : ठाणे जिल्ह्यात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्या बेलापुर विधानसभा मतदारसंघातील लढत राज्यात लक्षवेधी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपा, मनसे या पाच पक्षांसह प्रकल्पग्रस्त आघाडीनेही मातब्बर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविल्याने निवडणूकीत काट्याची टक्कर होणार असल्याचे संकेत दिसू लागले आहे.
शिवसेनेने जैन समाजाचे असणार्या उपनेते विजय नाहटा यांना निवडणूक रिंगणात उतरवून मातब्बर मोहरा निवडणूक रिंगणात पणाला लावलेला आहे. त्यातच आयएएस असणारे विजय नाहटा बेलापुरातील परभाषिकांसाठी व सुशिक्षितांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू बनू लागले आहेत. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात शिवसेनेचे विजय नाहटा आणि मनसेचे गजानन काळे यांनी पदयात्रेतून जनसंपर्क व भेटीगाठीवर भर दिल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपा व प्रकल्पग्रस्त आघाडीच्या तुलनेत सेना-मनसेचाच बोलबाला पहावयास मिळत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्तेच्या माध्यमातून केलेली विकासकामे मते मागण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात तरशिवसेना उमेदवार विजय नाहटा यांनीदेखील नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून केलेली जनहिताची कामे मते मागण्यासाठी कामाला येतील असा सूर शिवसैनिकांकडून आळविला जावू लागला आहे. विजय नाहटा यांनी महापालिका आयुक्त असताना केलेल्या जनहिताच्या कामाची यादीवर शिवसैनिक मते मागताना पहावयास मिळत आहे.
शिवसेना उमेदवार उपनेते विजय नाहटा यांनी गुरूवार , दि. २ ऑक्टोबर रोजी वाशी रेल्वे स्थानकासमोरील तुंगा हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या पत्रकार परिषदेत नाहटा काय बोलतात, कोणती माहिती सादर करतात, कोणते गौप्यस्फोट करतात, कोणावर आरोप केले जातात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहीले आहे.