सुजित शिंदे
नवी मुंबई : महाराष्ट्राचे लक्ष लागून राहीलेल्या बेलापुर मतदारसंघात शिवसेना- मनसेनेभाजपाने घरटी जनसंपर्क आणि पदयात्रेतून संवाद अभियान राबवित आघाडी घेतली आहे. कॉंग्रेसच्या बुधवारी नेरूळमध्ये झालेल्या मेळाव्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. गुरूवारीदेखील दिवसभर मनसेचे उमेदवार गजानन काळे नेरूळच पिंजून काढणार असल्याने मनसेचा नेरूळमध्ये धुराळा उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मनसेने शहर अध्यक्ष गजानन काळेंना निवडणूक रिंगणात उतरविल्याने युवा मनसैनिकांचा प्रचारादरम्यान कमालीचा उत्साह दुणावला आहे. बुधवारी सानपाडा परिसरात मनसे उमेदवार नसतानाही मनसेचे उपविभाग अध्यक्ष विलास घोणे व अन्य मनसैनिकांनी तसेच मनसेच्या महिला रणरागिनीनी घरटी जनसंपर्क अभियानातून परिसर पिंजून काढला होता.
नेरूळ सेक्टर सहामधील मार्केट जवळील हनुमान मंदीरापासुन सकाळी ९ वाजता मनसेचे उमेदवार शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या रॅलीस सुरूवात होणार आहे. सकाळी ९ ते १२ या बेळेत प्रभाग ६९ , दुपारी १२ ते ३ प्रभाग ७८, सांयकाळी ४ते ७ प्रभाग ६८, सांयकाळी ७ ते १० प्रभाग ७० मनसेकडून पिंजून काढण्यात येणार आहे.
मनसेचे नेरूळ पश्चिममधील विलास चव्हाण, सविनय म्हात्रे, अभिजित देसाई, महादेव पवार, राजेश कांबळे, अर्जुन चव्हाण, अजय सुपेकर आदी मंडळी मनसेच्या प्रचार अभियानाच्या जय्यत तयारीत व्यस्त असल्याचे पहावयास मिळाले.