अनुराग वैद्य
नवी मुंबई : लोकप्रतिनिधींनी केवळ वॉटर, मिटर, गटर याच कामावर लक्ष केंद्रीत करण्यापेक्षा त्या कामाबरोबरच झोपडपट्टी विकास, माथाडी कामगार, कष्टकरी, गोरगरीब व अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत, अशा भावना कॉंग्रेस पक्षाचे बेलापुर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार नामदेव भगत यांनी शुक्रवारी व्यक्त केल्या. नेरूळ येथील मस्जिदमध्ये जावून नामदेव भगत यांनी मुस्लिमांची भेट घेतली असता मुस्लिमांनी नामदेव भगत यांना आपला पाठिंबा जाहीर केला.
कॉंग्रेस पक्षाने नेहमीच कष्टकर्यांना व अल्पसंख्यांकाना न्याय देण्यासाठी प्रयास केले आहेत. बेलापुर मतदारसंघात आगरी-कोळी समाजाचे प्राबल्य असले तरी कॉंग्रेस पक्षाने सर्वसमावेशक भूमिका घेवून सर्व समाजबांधवांना एकत्रित घेवून चालण्याचेच काम सामाजिक व राजकीय क्षेत्रात केले असल्याचे नामदेव भगत यांनी यावेळी सांगितले.
नवी मुंबईच्या विकासाचा डांगोरा पिटणार्या नेतृत्वाने सर्व समाजबांधवांना बरोबर घेवून कार्य करण्याऐवजी केवळ आपल्या घरातीलच व नात्यातीलच लोकांना खासदार, आमदार, महापौर व नगरसेवक पदावर वर्णी लावून इतर समाजातील तरूणांना केवळ कार्यकर्ते म्हणून भालदार व चोपदार पध्दतीनेच काम करावे अशा पध्दतीने आपल्या पदाचा वापर केलेला आहे. या निवडणूकीत १५ ऑक्टोबर घराणेशाहीचा पाडाव करण्याचे मतदारांनी ठरविलेले असून त्याशिवाय अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्नही मार्गी लागणार नसल्याचे नामदेव भगत यांनी यावेळी सांगितले.
नामदेव भगत यांनी उपस्थित मुस्लिम जनसमुदायाला आपल्या मनातील भावना बोलून दाखविल्यावर ‘नामदेव भगत आगे बढो, हम आपके साथ है’ अशा जोरदार घोषणा देवून मुस्लिम बांधवांनी सर्व शक्तिनुसार व एकमताने कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करून बहूमताने निवडून आणण्याचे आवाहन केले.