सुजित शिंदे
नवी मुंबई : ठाणे जिल्ह्याच्याच नाही तर महाराष्ट्रातील लक्षवेधी लढतीमध्ये गणल्या जाणार्या बेलापुर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे आता बदलण्यास सुरूवात झाली आहे. ग्रामस्थांबरोबरच परप्रातिंय आणि सुशिक्षितांचाही कॉंग्रेस उमेदवार नामदेव भगत यांना उघडपणे मोठ्या प्रमाणावर समर्थन प्राप्त झाले आहे. शनिवारी सानपाडा-पामबीच भागात काढण्यात आलेल्या पामबीच भागात कॉंग्रेसचे उमेदवार नामदेव भगत यांना स्थानिक रहीवाशांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
सानपाडा-पामबीच परिसर हा गेल्या १४ वर्षापासून कॉंग्रेसचा पर्यायाने कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांचा राजकीय बालेकिल्लाच म्हणून नवी मुंबई कायर्र्क्षेत्रात गणला जात आहे. मागील दोन महापालिका निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने अथक प्रयास करूनही दशरथ भगत यांच्या बालेकिल्ल्यात त्यांना शिरकाव करता आलेला नाही. सानपाडा-पामबीच भागात दशरथ भगत यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणावर जनाधार असून त्यांचा या भागात घरटी जनसंपर्क दांडगा आहे.
शनिवारी सानपाडा-पामबीच भागात कॉंग्रेसचे उमेदवार नामदेव भगत यांची प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीचे नियोजन पूर्णपणे दशरथ भगत, निशांत भगत व कॉंग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केले होते. या रॅलीत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यां-पदाधिकार्यांबरोबर स्थानिक रहीवाशीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे पहावयास मिळाले.
दशरथ भगत यांनी नामदेव भगत यांना सानपाडा पामबीच भागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये फिरवून मतदारांना कॉंग्रेसची भूमिका समजावून सांगितली. रहीवाशांनी स्वत:हून नामदेव भगत यांच्याशी सुसंवाद साधला. सानपाडा-पामबीच परिसरात मराठी भाषिकांसह परभाषिकांचीही संख्या लक्षणीय आहे. सानपाडा-पामबीच आणि वाशी गावातूनच दशरथ भगतसाहेब कॉंग्रेसला आघाडी मिळवून देतील अन् बेलापुरात अमित पाटील हे नामदेव भगत यांच्या निर्णायक विजयावर शिक्कामोर्तब करतील असा सूर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आळविला जात आहे. गेल्या तीन-चार दिवसात कॉंग्रेसचे उमेदवार नामदेव भगत यांना नागरिकांचा, सामाजिक संस्थांचा पाठिंबा वाढत चालला असून प्रचार अभियानात त्या त्या भागातील स्थानिक रहीवाशीही मोठ्या संख्येने सहभागी होवू लागले आहे. कॉंग्रेसचा पंजा प्रथमच निवडणूक रिंगणात असल्याने अमराठी भाषिक, परप्रातिंय मतदार ही कॉंग्रेसची ‘व्होट बँक’ ठरणार असल्याचे संकेत नामदेव भगत यांच्या प्रचार अभियानामध्ये पहावयास मिळू लागले आहेत.