ऐरोलीतील निवडणूक प्रचारात जनतेकडून संदीप नाईकाच्या विजयाची ग्वाही
सुजित शिंदे
नवी मुंबई : आमदार म्हणून विधानसभेत सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सातत्याने मांडला. हा प्रश्न सोडविण्यासाठी अविरत पाठपुरावा केला. परिणामी या इमारतींचा पुनर्विकास २.५ एफएसआयच्या माध्यमातून करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे या इमारतींमधून जीव मुठीत घेवून राहणार्या लाखो रहिवाशांच्या डोक्यावरील अपघाताची टांगती तलवार दूर झाली आहे याचे मला समाधान आहे, असे प्रतिपादन ऐरोली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंगे्रसचे युवा उमेदवार संदीप नाईक यांनी केले आहे. रविवार ५ ऑक्टोबर रोजी श्री. नाईक यांच्या ऐरोलीतील प्रभाग क्रमांक १४,१५,१६ आदी प्रभागांमध्ये चौक सभा पार पडल्या. प्रचार फेर्या निघाल्या. या सभांमधून नागरिकांनी केलेली गर्दी पाहता श्री. नाईक यांचा विजय निश्चित असल्याची जणू ग्वाहीच मिळाली.
श्री.नाईक हे निवडणूक प्रचारामध्ये इतर सर्व उमेदवारांपेक्षा आघाडीवर आहेत. त्यांच्या निवडणूक प्रचाराला नागरिकांचा सर्वाधिक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो आहे. महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक, युवावर्ग अशा सर्व घटकांच्यावतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येते. विशेषतः त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान तरुण मंडळींचा भरणा अधिक असतो. संदीप नाईक हे विकासाभिमुख नेतृत्व आहे. सर्वांना ते आपुलकीची आणि सन्मानाची वागणूक देतात. आम्ही त्यांनाच पुन्हा आमदार म्हणून प्रचंड बहुमताने निवडून देणार, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. दिशाभूल करणार्यांना आणि अटटल गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना कदापी मत देणार नाही, असे नागरिकांनी ठामपणे सांगितले.
आमदार म्हणून काम करीत असताना मतदारसंघाचा आणि मतदारसंघातील सर्व घटकांचा समतोल विकास साधला आहे असे सांगून श्री.नाईक नागरिकांना संबोधित करताना म्हणाले की आपण केलेल्या विकास कामांचे श्रेय विरोधक घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. कार्यकर्त्यांनी आपली विकास कामे जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावी. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन, आधुनिक माता-बाल रुग्णालय, पहिला इको जॉगिंग ट्रॅक असे वैशिष्टयपूर्ण विकास प्रकल्प पूर्ण केले आहेत. काही विकास प्रकल्प पूर्णत्वास जात आहेत. ऐरोली भागातील होल्डिंग पॉंडचे सुशोभिकरण करुन त्यामधून बोटींग क्लबची सुविधा सुरु करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार आहे. आपल्या सर्वांच्या ताकदीवर भविष्यातही आमदार म्हणून आपणच ऐरोली मतदारसंघातील विकास कामांचे भूमीपूजन करु, असा जबरदस्त विश्वास श्री.नाईक यांनी यावेळी बोलून दाखविला.
नगरसेवक तात्या तेली, नगरसेवक अशोक पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाअध्यक्ष जी.एस.पाटील, समाजसेवक चंदू पाटील, माजी नगरसेवक सिताराम मढवी, दत्ताराम पाटील, सतीश काळे, शिवाजी खोपडे, सी.के.मढवी, चिंतामण केणी, कैलास गायकर आणि महिला पदाधिकारी या निवडणूक प्रचारादरम्यान संदीप नाईक यांच्या सोबत कार्यकर्ते आणि नागरिकांसह मोठया संख्येने उपस्थित होते.