नवी दिल्ली : क्रिकेटमधील विक्रमादित्य, ’भारतरत्न’ खासदार सचिन तेंडुलकरनं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. ’स्वच्छ भारत अभियाना’त सक्रिय सहभागी झालेल्या सचिननं ’सांसद आदर्श ग्राम योजने’अंतर्गत एक गाव दत्तक घेण्याचा आपला मानस यावेळी व्यक्त केला. सचिनच्या या सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेला मोदींनी दाद दिली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, वेगवेगळ्या व्यावसायिक जबाबदार्या सांभाळत असतानाच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर वेळात वेळ काढून सामाजिक उपक्रमांतही सहभागी होताना दिसतो. अलीकडेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’स्वच्छ भारत अभियान’ सुरू केल्यानंतर, सचिन आपल्या मित्रांसोबत झाडू घेऊन रस्त्यावर उतरला होता. स्वतः मोदींनी या मोहिमेसाठी ज्या नऊ जणांना ’टॅग’ केलं होतं, त्यात सचिनही होता. त्यानं आपण केलेल्या साफसफाईचा व्हिडिओ ’ट्विट’ करून ’स्वच्छ भारत ही सच भारत है’, असा संदेश आपल्या ’फॉलोअर्स’ना दिला होता. त्याबद्दल मोदींनी त्याची मुक्तकंठानं स्तुती केली होती.
या पार्श्वभूमीवरच, सचिननं, पत्नी अंजलीसोबत आज नरेंद्र मोदींची भेट घेतली. ’स्वच्छ भारत अभियान’ सुरू केल्याबद्दल त्यांनी मोदींचे आभार मानलेच, पण या मोहिमेच्या देशव्यापी प्रसार-प्रचारासाठी आपण झहीर खान, सायना नेहवाल, सरदारा सिंग यांनाही ’टॅग’ केल्याचं त्यानं आवर्जून सांगितलं. आपल्या डोक्यातील काही कल्पनाही त्यानं मोदींसोबत ’शेअर’ केल्या. त्यासोबतच, ’सांसद आदर्श ग्राम योजने’अंतर्गत एक गाव दत्तक घेण्याची इच्छाही सचिननं व्यक्त केल्याचं स्वतः मोदींनीच सोशल नेटवर्किंगवरून जाहीर केलंय. त्याच्या या निर्णयाचंही त्यांनी कौतुक केलंय.
गेल्या शनिवारीच नरेंद्र मोदींनी ’सांसद आदर्श ग्राम योजने’चा शुभारंभ केला होता. त्यांनी सगळ्या खासदार आणि नामनिर्देशित खासदारांना एकेक गाव दत्तक घेऊन ते २०१६ पर्यंत आदर्श गाव करायचं आवाहन केलं होतं. त्यांच्या या हाकेला सचिननं प्रतिसाद दिला आहे.