सुजित शिंदे
नवी मुंबई : जीवनात चढ उतार हे येतच असतात. एकाद्या अपयशाने खचून जायचे नसते. आयुष्यामध्ये सामाजिक , राजकीय क्षेत्रात वावरताना मी सातत्याने यश-अपयश पाहिले आहे.पचविले आहे. कालच्या घटनेने कार्यकर्त्यांनी खचून न जाता नव्या जोमाने, उमेदीने काम करावे. कारण येणारा भविष्यकाळ आपलाच असणार असल्याचे सांगत गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना नैराश्य झटकण्याचे आवाहन केले.
रविवारी झालेल्या मतमोजणीत १५०० मताच्या आसपास फरकाने गणेश नाईकांना पराभूत व्हावे झाले. राज्यातील धक्कादायक निकालामध्ये या निकालाचाही समावेश झाला. रविवारी ऐरोलीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विजय तर बेलापुरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पराभव झाला. ‘गड आला पण सिंह गेला’ अशी परिस्थिती नवी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसची झाली. एक जागा जिंकूनही ऐरोलीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसला विजयोत्सव साजरा करता आला नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तातडीने सोमवारी सकाळी वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये कार्यकर्त्यांना, पक्षीय पदाधिकार्यांना मार्गदर्शन करताना गणेश नाईक बोलत होते.
माझी प्रकृती बरी नसल्याने मतमोजणीदरम्यान मी उपस्थित राहू शकलो नाही. पराभवानंतर कार्यकर्त्यांना इच्छा असूनही भेटता आले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांशी संवाद साधता यावा, त्यांच्यातील नैराश्य झटकून नव्या जोमाने त्यांना उभे करण्यासाठी प्रेरणा देता यावी यासाठी तातडीने या बैठकीचे आयोजन केले असल्याचे सांगत बैठक आयोजनामागची पार्श्वभूमी गणेश नाईकांनी स्पष्ट केली.
१९९०,१९९५ साली मी आमदार झालो. १९९९च्या विधानसभा निवडणूकीतील मतमोजणीत काय झाले, ते आपणा सर्वांना माहितीच आहे. त्या पराभवानंतर खचून न जाता मी फक्त एक तास विश्रांती घेवून पुन्हा कामाला लागलो. आत्मचिंतन केले. त्यानंतर २००४ आणि २००९ साली पुन्हा आमदार झालो. कालच्या पराभवानंतर फक्त दोन तास विश्रांती घेवून पुन्हा कामाला लागलो. आत्मचिंतन केले. जीवनात डोंगर चढणार्यालाही उतरावेच लागले. यापुढे मी स्वत: नगरसेवकांच्या प्रभागांना भेटी देणार आहे. नगरसेवकांना, पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटणार आहे. यापुढे ना. गणेश नाईक म्हणून नाही तर फक्त आणि फक्त पूर्वीचा गणेश नाईक म्हणूनच भेटणार असल्याचे गणेश नाईक यांनी सांगितले.
अवघ्या आठ मिनिटांच्या भाषणात गणेश नाईकांनी कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधताना नैराश्य झटका, कामाला लागा, येणारा भविष्यकाळ आपलाच असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना उत्साहीत करण्याचे काम केले.
माजी खासदार संजीव नाईक, ऐरोलीचे आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक, उपमहापौर अशोक गावडे यांच्यासह विविध समित्यांचे सदस्य, सभापती, पक्षीय पदाधिकारी, शशिकांत बिराजदार, जे.डी.सुतार यांच्यासह आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता झाल्यावर सर्व कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेतल्यावर गणेश नाईक, संदीप नाईक, संजीव नाईक, सागर नाईक यांनी भावे नाट्यगृहातून प्रस्थान केले.