अनुराग वैद्य
नवी मुंबई : ‘घर फिरले की घराचे वासे फिरतात’ याची प्रचिती सध्या नवी मुंबईच्या राजकीय प्रवाहात दिसू लागले. अवघ्या साडे पाच महिन्यावर आलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बेलापुर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वपक्षीयांना आता भाजपाच्या कमळाचा विलक्षण ‘लळा’ लागला असून एकेकाळी बालाजी, व्हाईट हाऊसला जमणारी मंडळी दिवसाउजेडी गौरवच्या सभोवताली घुटमळू लागल्याने आगामी काळ राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी पर्यायाने बोनकोडेच्या नाईक परिवारासाठी खडतरच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत विधानसभा निवडणूक निकालानंतर अवघ्या आठवडाभरातच दिसू लागले आहे.
उगवत्या सुर्याला नमस्कार करण्याची प्रथा भारतीय राजकारणात पूर्वापारपासून चालत आलेली आहे. नवी मुंबईचे राजकारण तरी त्याला अपवाद कसे राहणार? मंदाताई म्हात्रे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये एरव्ही सौ. मंदा म्हात्रेंच्या संपर्कात तर सोडा, पण मंदाताईशी खुलेआमपणे बोलण्याचे धाडस न दाखविणारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील मंडळी आता मंदाताईशी आपली किती जवळीक आहे, त्यांचे नेतृत्व कसे प्रभावी आहे याचे खुलेआमपणे उखाणेच घेवू लागल्याने पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आयाराम-गयारामचा आगामी एक-दोन महिन्यात नवी मुंबईत कुंभमेळाच भरण्याची दाट शक्यता आहे.
विधानसभा निवडणूकीअगोदर भाजपाची नवी मुंबईतील राजकीय ताकद नगण्यच मानली जायची. महापालिकेच्या तिसर्या व चौथ्या सभागृहात जेमतेम एकच संख्याबळावर भाजपाला समाधान मानावे लागले होते. पण विधानसभा निवडणूकीअगोदर बेलापुर मतदारसंघातून सौ.मंदाताई म्हात्रे आणि ऐरोली मतदारसंघातून वैभव नाईक अशी मातब्बर जोडगोळी भाजपाच्या छावणीला उपलब्ध झाली. निवडणूकीत मंदाताई आमदार झाल्या आणि वैभव नाईकांनी ४६ हजार मतांचा आकडा ओंलाडला.नवी मुंबईच्या बदलत्या राजकीय समीकरणाची नांदीच मतपेटी उघडल्यापासून सुरू झाली.
एप्रिलच्या दुसर्या आठवड्यात नवी मुंबई महापालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. ज्या प्रभागात भाजपाला शंभर-दोनशे मतांची मारामारी असायची, त्या प्रभागातून भाजपाने हजार आकडा ओंलाडत महापालिकेच्या आगामी सभागृहात आपल्या दावेदारीचे आतापासून बिगुल वाजविण्यास सुरूवात केली आहे. भाजपाला मिळालेली मते आणि प्रभागाप्रभागात मिळालेली मते पाहता ऐरोली आणि बेलापुर विधानसभा मतदारसंघात पालिका निवडणूकीकरीता भाजपाच्या तिकीटीकरीता मोर्चेबांधणीकरीता आतापासूनच अनेक मातब्बरांनी मोर्चेबांधणीस सुरूवात केली आहे. शिवसेनेच्या तुलनेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये भाजपाच्या जाण्याची अनेकांना घाई लागल्याचे नवी मुंबईत उघडपणे पहावयास मिळत आहे. अनेकांनी मंडळांच्या आणि सामाजिक संस्थांच्या नावांनी सौ. मंदाताई म्हात्रेंच्या अभिनंदनाचे फलकही लागले आहेत.
एकेकाळी बालाजीच्या तळमजल्यापाशी, व्हॉईट हाऊसलगत गर्दी करणारे आता गौरव बंगल्यासभोवताली रेंगाळू लागल्याने नवी मुंबईच्या बदलत्या राजकारणाचा कल उघडपणे पहावयास मिळू लागली आहे. एकेकाळी महापालिका निवडणूकीत तिकीट मिळावी म्हणून बोनकोडेच्या बालाजीच्या एका कटाक्षासाठी झुरणारी मंडळी आता भाजापकडे स्पष्टपणे झुकू लागली आहेत. सिवूड्स भागातील मंडळी उघडपणे आता भाजपाकडे गेली आहेत. सारसोळे, नेरूळ सेक्टर ४ मधूनही भाजपाच्या छावणीत काही गेले आहेत. राष्ट्रवादीचे नगरसेवक मोठ्या संख्येने भाजपाकडून निवडणूक लढविण्यासाठी मोर्चेबांधणी करू लागली आहेत. कॉंग्रेसच्या एका मातब्बर नेत्यानेही जानेवारीत भाजपात आपण जाणार असून महापालिकेत तुम्हाला तिकीट देण्याच्या बोलीवरच आपण भाजपात प्रवेश करणार असल्याचे कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सांगितलेे. आपल्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळाले तरच आपण भाजपा प्रवेशाचा विचार करणार असल्याचे संबंधित कॉंग्रेस नेत्याने उघडपणे सांगण्यास सुरूवात केली आहे.
महापालिका स्तरावर पालिका सभागृह स्थापनेपासून गणेश नाईकांचा प्रभाव कायम राहीलेला आहे.परंतु बदलत्या राजकीय समीकरणात भाजपाकडून आमदार सौ.मंदाताई म्हात्रे, वैभव नाईक, शिवसेनेकडून उपनेते विजय नाहटा, जिल्हाप्रमुख विजय चौगुले, कॉंग्रेस या विरोधकांचा सामना करणे राष्ट्रवादी कॉंग्रेसला अवघड जाणार आहे. गणेश नाईक हे महाराष्ट्रातल्या मुरब्बी राजकारण्यांपैकी एक गणले जातात. बदलत्या राजकीय बदलाची त्यांना नक्कीच चाहूल लागली असणार. १९९९ मध्ये झालेल्या पराभवात आणि आताचा पराभव यात जमिन आसमानचा फरक आहे. १९९९साली आताच्या तुलनेत विरोधक मातब्बर नव्हते, आता विरोधक मातब्बरच नाहीत तर आक्रमकही आहेत. मतदारांची मानसिकताही बदललेली आहे. राजकीय विरोधकच नाही तर मतदारही विरोधात गेले आहेत. परप्रातिंय, अमराठी भाषिक मतदारांचा भाजपाकडे कल झुकू लागलेला आहे.
एप्रिलमध्ये येवू घातलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीचे बिगुल वाजण्यास सुरूवात झालेली आहे. भाजपाच्या छावणीत पाहूण्या मंडळीची गर्दी वाढण्याचे संकेत दिसू लागले आहेत. मतदारांची बदलती मानसिकता, राष्ट्रवादीच्या छावणीतील अनेकांना भाजपात जाण्याची झालेली घाई, मातब्बर विरोधक या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत आपले राजकीय अस्तित्व, प्रभूत्व टिकविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला पर्यायाने गणेश नाईकांना खडतर वाटचालीचा सामना करावा लागणार आहे.