सानपाडा पामबीच पॉश एरियाला सिडकोच्या अविकसित बकाल भुखंडाचे गालबोट
नवी मुंबई : सानपाडा-पामबीच परिसर हा नवी मुंबईतील पॉश एरियामधील एक एरिया गणला जातो. पण याच परिसरात ठिकठिकाणी असलेल्या सिडकोच्या अविकसित, बकाल भुखंडामुळे परिसराला गालबोट लागले असून सानपाडा-पामबीच सेक्टर १९ मधील प्लॉ ७ वरील अशाच एका अविकसित, बकाल भुखंडाचा वाहन मालकांनी ताबा घेतला असून या भुखंडाला वाहन पॉर्किगचे स्वरूप आणले आहे.
सानपाडा-पामबीच भागात जयपुरिया स्कूलच्या थोडे पुढे गेल्यावर आपणास रिलायन्सचा पेट्रोलपंप लागतो. या पेट्रोलपंपाच्या समोरच सिडकोचा मोठ्या स्वरूपातील विस्तीर्ण भुखंड असून या भुखंडावर सिडकोच्या मालकीचा फलक असून अतिक्रमण केल्यास कारवाई केली जाईल, असे स्पष्टपणे नमूद केेलेले आहे. हा भुखंड विकसित न झाल्याने येथे बकालपणा आला असून ठिकठिकाणी जंगली गवतही वाढलेले आहे. गेल्या काही महिन्यापासून या भुखंडावर मोठ्या संख्येने ट्रक उभे राहण्यास सुरूवात झाली असून या भुखंडाला छोटेखानी ट्रक टर्मिनलचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सिडकोच्या भुखंडावर ट्रकचालकांनी ताबा घेत भुखंडाला ट्रक टर्मिनल बनविले असतानाही सिडकोकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जात असल्याचा संताप स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त केला जात आहे. आज ट्रक टर्मिनल बनविले, उद्या झोपडपट्टीही बनविली जाण्याची भीती पामबीचवासियांकडून व्यक्त केली जात आहे.