नवी मुंबई : एप्रिल महिन्यात येवू घातलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीचे पडघम आतापासूनच उमटण्यास सुरूवात झाली आहे. भाजपाचा वाढता प्रभाव, राष्ट्रवादी कॉंग्रेस अन् कॉंग्रेसमधील अनेकांना भाजपात जाण्याची लागलेली घाई या पार्श्वभूमी महापालिकेच्या आगामी सभागृहात सध्याची सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस तिसर्या स्थानावर फेकली जाण्याची शक्यता निर्माण झाली असून सत्तास्थापनेसाठी पर्यायाने महापालिका ताब्यात घेण्यासाठी शिवसेना-भाजपातच खरी लढाई होण्याचे चित्र आतापासूनच स्पष्ट झाले आहे.
एप्रिल महिन्याच्या दुसर्या आठवड्यात महापालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणूक होत असून सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसची पर्यायाने महापालिकेवर आजातगायत एकहाती वर्चस्व मिळविलेल्या गणेश नाईकांची कोंडी करण्यासाठी भाजपा-शिवसेनेकडून विधानसभा निवडणूकानंतर जय्यत तयारी सुरू झाल्याचे उघडपणे पहावयास मिळत आहे. महापालिका सभागृहातील अधिकांश नगरसेवकांना अचानक भाजपा पे्रमाचा उमाळा फुटला असून पॅनल सिस्टिम तसेच प्रभाग आरक्षण स्पष्ट झाल्यावर भाजपातील ‘इनकमिंग’ वाढण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या गतनिवडणूकीत शिवसेना-भाजपा युती झाली होती. त्यावेळी ८९ जागांपैकी शिवसेनेने जेमतेम १४ जागा भाजपाला देवू केल्या. त्या १४ जागाही वाशी सेक्टर १७चा अपवाद वगळता गावठाण भागातीलच होत्या.आता मात्र परिस्थितीत बदल झाला आहे. कमजोर भाजपा अचानक मोदीपर्वानंतर बलाढ्य भासू लागली आहे. बेलापुर विधानसभा मतदारसंघातून सौ. मंदाताई म्हात्रेंच्या रूपातून भाजपा आमदार निवडून आला आहे. ऐरोली मतदारसंघातून वैभव नाईकांनी भाजपाच्या कमळाला ४६ हजारापेक्षा अधिक जनाधार मिळवून दिला आहे.आमदार हा निकष वगळता ऐरोली व बेलापुर विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपाचा जनाधार जवळपास सारखाच असल्याचे विधानसभा मतमोजणीत स्पष्ट झाले आहे. मागील निवडणूकांप्रमाणे भाजपा शिवसेनेच्या तुलनेत कमकुवत वा पडती भूमिका घेण्याची सुतरामही शक्यता नाही. पालिका स्तरावर शिवसेनादेखील भाजपासमोर शरणागती पत्करणे अवघड आहे. भाजपाला आयात मातब्बरांचे पाठबळ मोठ्या संख्येने जानेवारीत मिळण्याची शक्यता असल्याने स्वबळावर भाजपा पालिका निवडणूकीत नशिब आजमावण्याची अधिक शक्यता आहे.
शिवसेनेकडे उपनेते विजय नाहटा आणि जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्यासारखे मातब्बर प्रचारयंत्रणा सांभाळण्यासाठी सक्षम नेतृत्व उपलब्ध आहे. विजय नाहटा हे प्रचारात कशा प्रकारे आक्रमक प्रचार करून विरोधकांना घायाळ करू शकतात याची प्रचिती विधानसभा निवडणूकीत जवळून पहावयास मिळाले आहे. निवडणुकीतले नियोजन कौशल्य नाहटा यांचे वाखाण्यासारखे आहे. घणसोली कॉलनी, घणसोली गाव, ऐरोली, दिघा भागात विजय चौगुलेंचाच प्रभाव असल्याचे मतपेटीत पुन्हा एकवार स्पष्ट झाले आहे. महापालिका निवडणूकीत पंतप्रधान मोदी दोन सभा घेणार असल्याची टूम भाजपा छावणीतून सोडण्यात आल्याने अनेक मातब्बरांना भाजपामध्येच आपले भवितव्य असल्याचा साक्षात्कार आतापासूनच होवू लागला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गणेश नाईकांचा अपवाद वगळता शिवसेना-भाजपाचा सामना करण्याइतपत सक्षम नेतृत्व आजमितीला कोणीही उपलब्ध नाही. सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेकांनी आताच कमळाबाईशी संधान साधण्यास आक्रमकता दाखविल्याने राष्ट्रवादीच्या छावणीत संशयकल्लोळाचा प्रयोग लवकरच सुरू झालेला पहावयास मिळेल. एकेकाळी शिवसेनेने सलग तीन महापौर नवी मुंबई शहराला दिले होते. नागरी विकास आघाडीचा दोन वर्षाची टर्म सोडल्यावर त्यानंतर सलग चार महापौर राष्ट्रवादी कॉंग्रेसने नवी मुंबईला महापौर दिले होते. पण पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीनंतर नवी मुंबईचा महापौर हा शिवसेना-भाजपा या दोन पक्षापैकीच एकाचा असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.
विधानसभा निवडणूकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसची अग्निपरिक्षा सुरू झाली आहे. जहाज बुडू लागल्यावर उंदीर पहिले पळतात, त्याधर्तीवर राष्ट्रवादीतील उंदरांचा गौरव बंगल्याचा लळा अचानक वाढीस लागला आहे. निष्ठावंतांच्या आणि श्रध्दावतांच्या पाठबळावर गणेश नाईकांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अस्तित्वासह प्रभूत्व स्पष्ट करण्याच्या अग्निपरिक्षेला सामोरे जावे लागणार आहे.