* नेरूळ सेक्टर सहाला साथीच्या आजारांचा विळखा
* रस्त्यामधील गटारांनी अडविले वाहते पाणी
* डेंग्यूचे, मलेरियाचे वाढते रूग्ण
* एका बांधकामामुळे अडले गटाराचे पाणी
नवी मुंबई : महापालिका प्रशासनाकडून कामाच्या नियोजनाचा बोजवारा उडाला की करदात्या नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो याचे चित्र सध्या नेरूळ सेक्टर सहा परिसरात पहावयास मिळत आहे. गटारांचे चुकीचे नियोजन आणि एका बांधकामामुळे बुजविले गेलेले गटर यामुळे संपूर्ण नेरूळ सेक्टर सहा परिसराला साथीच्या आजारांचा विळखा बसला असून परिसरात डेंग्यू, मलेरियाचे रूग्ण पहावयास मिळत आहे. आरोग्य विभागाने याबाबत स्पष्टपणे हात झटकले असून गटारांची साफसफाई आणि संबंधित बांधकामामुळे बुजविण्यात आलेल्या गटारांकडे नेरूळ विभाग कार्यालयाचा कानाडोळा यामुळे नेरूळ सेक्टर सहामध्ये साथीचे आजार वाढत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
आठवडाभरापासून नेरूळ सेक्टर सहा परिसरात अचानक डासांची घनता वाढल्याने परिसरातील सिडको सोसायटीतील तसेच साडेबारा टक्के प्लॉटवरील इमारतीमधील, गावठाणातील इमारतीमधील रहीवाशी त्रस्त झाले आहे. सिडको सोसायट्या, साडेबारा टक्केतील इमारती, गावठाणातील इमारती येथे मलेरिया आणि डेंग्यूचे रूग्ण स्पष्टपणे दिसू लागले आहेत. वाढत्या डासांबाबत कॉंग्रेसचे नेरूळ तालुका चिटणिस व सारसोळे गावातील युवा सामाजिक कार्यकर्ते मनोज मेहेर यांनी बुधवारी सांयकाळी धुरफवारणीचे ठेकेदार सचिन शेवाळे यांची भेट घेवून परिसरातील साथीचे वाढते आजार लक्षात घेवून त्यांना गृहनिर्माण सोसायट्यांच्या आतील भागातही धूरफवारणी करण्याची विनंती केली. यानंतर त्यांनी पालिका मुख्यालयात आरोग्य विभागातही संपर्क साधून साथीच्या आजाराचे गांभीर्य संबधितांच्या निदर्शनास आणून दिले.
गुरूवारी सकाळीच आरोग्य विभागाची सर्व टीम नेरूळ सेक्टर सहामधील सिडको वसाहतीमध्ये दाखल झाली. मनोज मेहेर यांनी यावेळी सिडको सोसायट्यांमधील डेंग्यू व मलेरियाचे रूग्ण कोठेकोठे आहे, याची माहिती दिली. प्लॉट १५ वरिल सिडकोच्या ९६ सदनिकांच्या शिवम सोसायटीत धुरीकरण कर्मचार्यांसोबत फिरून मनोज मेहेर यांनी धुरीकरण करून घेतले. मनोज मेहेर यांच्या पाठपुराव्यातून हे काम होत असल्याचे रहीवाशांनी जवळून पाहिले.
डासांच्या वाढत्या घनतेबाबत व साथीच्या आजाराबाबत मनोज मेहेर यांनी आरोग्य अधिकार्यांना विचारणा केली असता, त्यांनी या प्रकाराला नेरूळ विभाग कार्यालयशीच संपर्क साधा असे सांगितले. रस्त्यावर बांधण्यात आलेल्या नवीन गटारांचे नियोजन फसल्याने पाणी वाहण्यास अडथळे होतात. नव्याने पाणी जाण्यासाठी मार्ग काढावा लागेल. तसेच नेरूळ सेक्टर सहामध्ये मेरेडीयन इमारतीच्या पुढे काही अंतरावर कुकशेतकडे जाताना सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकामामुळे गटरे बुजली असून पाणी जात नाही. याबाबतही आम्ही पालिका विभाग कार्यालयाला कल्पना दिली असून गटारांची वेळीच सफाई झाल्यास आणि पाणी वाहते राहील्यास डासांचा उद्रेक होणार नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
पालिका विभाग अधिकारी राजेंद्र सोनवणे यांना तात्काळ आरोग्य कर्मचार्यांसमोरच संपर्क साधला असता, त्यांनी आपण रजेवर असून उद्याच ही समस्या सोडवू असे सांगितले. त्यांनी समस्येचे गांभीर्य लक्षात घेवून जयेश पाटील यांना संपर्क साधण्यास सांगितले. मनोज मेहेर यांनी जयेश पाटील यांना संपर्क केल्यावर गटारांची सफाई सुरू झाली.
डासांचा उद्रेक, साथीचे वाढते आजार या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे पदाधिकारी व सारसोळे गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते मनोज मेहेर यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून सिडकोच्या सोसायटी आवारात धुरीकरण करून घेतले. गटारांची साफसफाई करवून घेतली.