नवी मुंबई : वाशी सेक्टर १७ परिसरात वाहन पॉर्किगचा प्रश्न दिवसेंदिवस भयावह स्वरूप धारण करू लागलाय. नवीन ठेकेदार महापालिका प्रशासनाने नियुक्त न केल्यानेे वाशी १७ परिसरात मनमानी वाहन पॉर्किग सुरू आहे. नो पॉर्किगचा फलक असतानाही वाहनचालक बिनधास्त पॉर्किग करताना पहावयास मिळत आहे. वाहनेच उचलून नेतील ना, ओळखीवर पैसा न देता सोडवून आणता येतील, वाहने उभी करायलाच जागा नाही, कोठे उभी करू असा सूर वाहनचालकांकडून आळविला जात आहे.
वाशी सेक्टर १७ परिसरात मनमानी वाहन पॉर्किगला लगाम घालण्यासाठी व वाहन पॉर्किगला शिस्त लागण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून ‘पे ऍण्ड पॉर्किग’ तत्वावर ठेकेदार नियुक्त केले होते. तथापि गेल्या दोन वर्षापासून ठेका वाढवून न दिल्याने व अन्य कोणाही नवीन ठेकेदाराला ठेका न दिल्याने पुन्हा वाशी सेक्टर १७ मध्ये वाहनचालक कोठेही वाहने उभी करू लागले आहे. दुचाकी वाहनांची चोरी, मोठ्या वाहनातून कारटेपची चोरी असे गुन्हेदेखील पुन्हा वाढीस लागले आहेत.
वाशी सेक्टर १६ मध्ये एमटीएनएल कार्यालयाच्या मागील बाजूस पालिका प्रशासनाकडून नव्या स्वरूपात ‘पे ऍण्ड पॉर्किग’ व्यवस्था सुरू केली असली तरी वाहनचालकांकडून त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. एमटीएनएलच्या मागील बाजूस रस्त्यावर महापालिका प्रशासनाकडून ठिकठिकाणी ‘नो पॉर्किग’चे फलक लागलेले असतानाही वाहनचालक बिनधास्तपणे आपली वाहने तेथे उभी करून कामासाठी निघून जात असल्याचे पहावयास मिळत आहे. बेकायदा ठिकाणी पॉर्क केलेल्या वाहनांवर कारवाई करून वाहने उचलून नेली तरी फारसा फायदा होत नाही. वाहनचालक पोलिसांतील अथवा राजकारण्यांतील आपल्या ओळखीचा फायदा घेत दंड न घेता आपली वाहने सोडवून नेत असल्याने टोईगचे वाहनचालक व वाहतुक पोलीसही हताश झाल्याचे उघडपणे पहावयास मिळत आहे.