* जनसंपर्क कार्यालयातही मुबलक युवा गर्दी
नवी मुंबई : वाढत्या महागाईची झळ कार्यकर्ता संकलनालाही बसली असून हल्लीच्या काळात कार्यकर्ता सांभाळणे म्हणजे पांढरा हत्ती सांभाळण्यासारखे होवून बसले आहे. अवघ्या पाच महिन्यावर येवू घातलेल्या नवी मुंबई महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ‘वाय-फाय बसवा अन् कार्यकर्ते मिळवा’ हा अजब फंडा नवी मुंबईतील राजकारण्यांनी आत्मसात केल्याचे ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे.
व्हॉट्स अपचे वाढते फॅड तरूणाईला आकर्षित करू लागल्याची बाब आता एव्हाना जुनी झाली आहे. तरूणाई व आता शालेयवयीन मुलेही आपल्या भ्रमणध्वनीवर सातत्याने व्हॉटसअपवर चॅट करताना आपणास पहावयास मिळतात. नेट पॅक सातत्याने संपत असल्याने तरूणाईमध्ये वाय-फायचे आकर्षण वाढीस लागले आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूका अवघ्या पाच महिन्यावर येवून ठेपल्या आहेत. प्रभाग आरक्षणाबाबत व नियोजित पॅनलबाबत अनिश्चितता कायम असतानाही निवडणूक लढविण्याची महत्वाकांक्षा बाळगणार्यांसोबत हवशा-नवशा-गवशांनीही जनसंपर्क कार्यालये उघडण्यास सुरूवात केली आहे. जनसंपर्क कार्यालय उघडली म्हणजे कार्यालयात कार्यकर्त्यांची वा समर्थंकांची गर्दी दाखविणे हे ओघाने आलेच. कार्यकर्ते सांभाळणे, कार्यकर्त्यांवर खर्च करणे ही अलिकडच्या काळात कमालीची खर्चिक बाब झाली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांचा दुष्काळ प्रत्येक पक्षात जाणवू लागला आहे. त्यामुळे आजच्या तरूणाईमध्ये व्हॉटस अपचे असलेले व्यसन लक्षात घेवून तरूणाईला कॅश करण्यासाठी वाय-फायचा फंडा आजमावण्यास राजकारण्यांनी सुरूवात केली आहे.
राजकारण्यांच्या अथवा पक्षीय जनसंपर्क कार्यालयात ‘वाय-फाय’ बसल्याची वार्ता समजताच तरूणाईची पाऊले आपसूकच मोफत वाय-फायकरीता त्या कार्यालयाकडे वळू लागली आहेेत. महागाईच्या काळात पाच-सहा कार्यकर्ते सांभाळणे अग्निदिव्य होवून बसले असतानाच वाय-फाय सेवेमुळे २० ते २२ जण कार्यालयात बसलेले पहावयास मिळू लागले आहे. कार्यालयात जागा नसेल तर कार्यालयाच्या बाहेरच तरूणाई वाय-फायचा फायदा घेण्यासाठी गर्दी करू लागली आहे . लांबून पाहणार्याला जनसंपर्क कार्यालयात युवा वर्गाचा गराडा असलेला पहावयास मिळतो. मुलांना सांभाळणारा स्थानिक नेता अशी आपसूकच त्या संबंधित नेत्याची ‘इमेज’ तयार होण्यास सुरूवात होते.
वाय-फायच्या आमिषाने युवा वर्ग संबंधित नेता असो वा नसो, त्याच्या कार्यालयात बसूनच राहत असल्याचे पहावयास मिळते. रात्रीचे ११-१२ वाजले तरी ही गर्दी हटण्याचे नाव घेत नाही. वाय-फायला असणारा पासवर्ड राजकारण्यांकडून मिळवायचा आणि तेथेच आपला व्हॉट्स अप, व्हॉटस अप खेळ सुरू करायचा. कार्यकर्ते सांभाळण्यापेक्षा वाय-फाय सेवा ही अत्यल्प दरातील सुविधा असल्याने राजकारण्यांच्या खिशालाही फारशी झळ जाणवत नाही.
नेरूळ, कोपरखैरणे, सानपाडा, जुईनगर, घणसोली कॉलनी, सिवूड्स, ऐरोलीसह अन्य भागातील राजकारण्यांनी पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वाय-फाय सेवा मोठ्या प्रमाणात सुरू केल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे आरक्षण निश्चिती व पॅनलची संभ्रमावस्था संपेपर्यत कार्यकर्ते सांभाळण्यासाठी वाय-फायचा बरा असे राजकारण्यांकडून उघडपणे बोलले जावू लागले आहे.