नवी मुंबई : सहकार क्षेत्रातील दिग्गज प्रस्थ आणि नवी मुंबई शहराचे उपमहापौर अशोक गावडे यांच्या मातोश्री शालिनी अकुंशराव गावडे यांचे शनिवारी सकाळी ६ वाजता अल्प आजाराने निधन झाले. त्यांचे मृत्यूसमयी वय ८१ वर्ष होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुली, सुना-जावई, नातवंडे असा विशाल परिवार आहे.
नेरूळ सेक्टर २-४ येथील सारसोळे गावच्या स्मशानभुमीत शनिवारी सांयकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास अंत्यविधी झाला. यावेळी शोकाकुल अशोक गावडे यांचे सांत्वन करण्यासाठी व त्यांना धीर देण्यासाठी स्मशानभूमीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ठाणे जिल्ह्यातील मातब्बर नेते व ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, ऐरोलीचे आमदार संदीप नाईक, जुन्नरचे मनसेचे आमदार शरद सोनवणे, नवी मुंबईचे महापौर सागर नाईक, बाजार समिती संचालक अशोक वाळूंज, शंकर पिंगळे, कॉंग्रेसचे नेरूळ तालुका चिटणिस मनोज मेहेर, महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवक, नगरसेविका, बाजार समितीमधील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गणेश नाईक यांनी उपस्थित जनसमुदायाच्या वतीने श्रध्दाजंली वाहताना गावडे परिवाराच्या वाटचालीचा आढावा घेतला.
रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नेरूळ सेक्टर २-४ येथील सारसोळे गावच्या स्मशानभूमीत राखाडीचा कार्यक्रम झाला. यावेळी स्मशानभूमीत बाजार समितीमधील व्यापारी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे देविदास सुतार, कॉंग्रेसचे दिलीप आमले उपस्थित होते.
दशक्रिया विधी रविवारी, २ नोव्हेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी या त्यांच्या गावी सकाळी ८ वाजता होणार आहे.