* चार उद्वाहनांपैकी एकच चालू
* रूग्णांसह नातेवाईकांचेही हाल
* मेंटेनन्स न भरल्याने ठेकेदाराचे दुर्लक्ष
* डॉक्टरांनी ठेवले कानावर हात
सुजित शिंदे
नवी मुंबई :- राज्य शासनासह केंद्र शासनाचे सातत्याने पुरस्कार मिळविणार्या नवी मुंबई महापालिकेचा कारभार म्हणजे ‘बडा घर अन् पोकळ वासा’ या स्वरूपात असल्याचे वारंवार पहावयास मिळत आहे. नवी मुंबईकरांच्या आरोग्याची जपणूक करण्याचा दावा करणार्या आरोग्य विभागाच्या कारभाराचे सातत्याने धिंडवडे निघतच आहेत. नवी मुंबई महापालिका वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयातील चारपैकी तीन उद्वाहने (लिफ्ट) बंद असून एका चालू उद्वाहनाला सेवा पुरविण्यात मर्यादा पडत आहेत. बंद उद्वाहनामुळे रूग्ण, रूग्णाचे नातेवाईक, वैद्यकीय कर्मचारी यांचे अतोनात हाल होत असून आरोग्य विभागाने उद्वाहन देखभाल करणार्याची बिले थकविल्याने हा प्रकार सुरु असल्याचा आरोप कॉंग्रेस पक्षाचे नेरूळ तालुका चिटणिस मनोज मेहेर यांनी केला आहे.
गुरूवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी महापालिकेची उद्वाहने बंदच होती. शुक्रवारी दि. १७ ऑक्टोबर रोजी महापालिकेचे एक उद्वाहन सुरू करण्यात आले. महापालिका रूग्णालयातील रूग्णांपैकी काहींनी शुक्रवारी सकाळी नेरूळ तालुका कॉंग्रेस पक्षाचे चिटणिस मनोज मेहेर यांच्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क करून बंद उद्वाहनांचा व होत असलेल्या त्रासाची कल्पना दिली. मनोज मेहेर यांनी तात्काळ सारसोळे गावातील व नेरूळ सेक्टर सहा परिसरातील कॉंगेे्रस कार्यकर्त्यांसमवेत वाशीच्या प्रथम संदर्भ पालिका रूग्णालयात धाव घेतली. सर्वप्रथम सर्वसामान्य रूग्णाचे नातेवाईक म्हणून रूग्णालयीन कर्मचारी वॉर्ड बॉय, परिचारिका, सुरक्षा रक्षक यांच्याशी बंद वाहनाबाबत मनोज मेहेर यांनी चर्चा केली. महापालिका रूग्णालयातील उद्वाहनाची देखभाल व दुरूस्ती करणार्या ठेकेदाराची बिले आरोग्य विभागाकडून देण्यात न आल्याने त्याने उद्वाहने बंद करून ठेवल्याची माहिती मनोज मेहेर यांना दिली.
मनोज मेहेर यांनी आरोग्य विभागाला बंद असलेल्या उद्वाहनामुळे रूग्णांचे व रूग्णांच्या नातेवाईकांचे हाल या प्रकाराबाबत जाब विचारण्यासाठी रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक वाघ यांच्या कार्यालयात धाव घेतली. डॉ. वाघ व त्यांच्या लगत बसलेल्या सहकारी डॉक्टरांनी उद्वाहने बंद असल्याचे मान्य करून याबाबत डॉ.जवांदे अथवा डॉ. चव्हाणच अधिक माहिती देतील असे सांगून अधिक माहिती देण्यास असमर्थतता व्यक्त केली. यावेळी मनोज मेेहेर यांच्यासमवेत मिडीयाचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते.
मनोज मेहेर यांनी तात्काळ त्यानंतर रूग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर धाव घेत रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जंवादे, प्रशासकीय अधिकारी डॉ. महेश चव्हाण, अशोक मढवी यांच्या कार्यालयात धडक दिली. या तीन रूग्णालयीन अधिकार्यांपैकी एकही यावेळी त्यांच्या कार्यालयात उपस्थित नव्हता. डॉ. जंवांदे व डॉ. चव्हाण पालिका मुख्यालयात बैठकीसाठी गेले असल्याचे त्यांच्या कार्यालयासमोर असणार्या आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी माहिती दिली.
प्रथम संदर्भ रूग्णालय हे महापालिकेचे एकमेव मोठे व अद्ययावत रूग्णालय आहे. नवी मुंबई शहर, पनवेल, उरण, ठाणे तसेच गोवंडी-मानखुर्द भागातूनही रूग्ण येथे उपचारासाठी येत असतात. बंद उद्वाहनांमुळे रूग्णांचे व रूग्णांच्या नातेवाईकांचे अतोनात हाल सुरू असून चालू असणार्या एका उद्वाहनावर मर्यादा पडत आहेत. उद्वाहनाच्या देखभालीचे पैसे ठेकेदाराला देता येत नसतील तर मोठेपणाचा आव आणून विकासकामांचे श्रेय घेताच कशाला असा उपहासात्मक आरोप मनोज मेहेर यांनी यावेळी केला.
गुरूवारी दिवसभर एकही उद्वाहन सुरू नव्हते. शुक्रवारी सकाळी एक उद्वाहन सुरू करण्यात आले. देयक थकविल्याने उद्वाहन देखभाल करणार्या ठेकेदारांने हा प्रकार केल्याची माहिती सुरूवातीला सांगणार्या पालिका वैद्यकीय कर्मचार्यांची नंतर तारांबळ उडाली. विचारणा करणारा कॉंग्रेसचा पदाधिकारी व सोबत असणारे तीन-चार जण पत्रकार असल्याचे समजताच रूग्णालयीन कर्मचार्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. उलटपक्षी आम्हाला येथे नोकरी करायची असल्याने आम्ही ही माहिती दिली कोणाला सांगू नका, अशा विनवण्याही त्यांनी मनोज मेहेर यांना केल्या. बंद पडलेल्या उद्वाहनामुळे नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाची प्रतिष्ठा पुन्हा एकवार धुळीला मिळाली आहे.