नवी मुंबई : ऐरोलीत साकारलेल्या इको जॉगिंग ट्रॅकच्या धर्तीवर घणसोली पामबीच मार्गावर जॉगिंग ट्रॅक उभारणार असल्याची माहिती आमदार संदीप नाईक यांनी बुधवारी दिली. आमदार नाईक यांनी आज घणसोली येथील पामबीच मार्ग, अम्युजमेंट पार्क आणि तुर्भे येथील एनएमएमटी डेपोचा पाहणी दौरा केला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
आमदार नाईक यांनी बुधवारी सकाळी घणसोलीतील पामबीच मार्गाला भेट दिली. याठिकाणी मोठया संख्येने नागरिक मॉर्निंग वॉकसाठी दररोज येत असतात.रस्त्यांवरील पदपथ आणि दुभाजकांमध्ये उगवलेली झुडुपे काढून साफसफाई करुन घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना दिले. याठिकाणी विविध सुविधा उपलब्ध
करुन देण्यासाठी महापालिका, पोलीस आणि सिडकोच्या वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. स्वच्छतागृहे, ज्येष्ठ आणि इतर घटकांसाठी बसण्यासाठी बाक, महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे गस्त पथक, बीट चौकी, वेग नियंत्रणासाठी रम्बलर, रात्रीच्या वेळेस अधिक उजेड देणारे हायमास्ट दिवे इत्यादी सुविधा निर्माण करण्याचा
प्रयत्न असणार आहे, असे त्यांनी नमूद केले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जॉगिंग ट्रॅक करण्यात येतील, पदपथांचे सुशोभिकरण करण्यात येईल. तसेच या जॉगिंग ट्रॅकमध्ये योगा करण्याची सोय देखील निर्माण करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आमदार नाईक यांच्या प्रयत्नाने घणसोलीत अम्युजमेंट पार्क साकारत आहे. नवी मुंबईचे लॅन्डमार्क ठरेल, असा हा प्रकल्प आहे. सुरु असलेल्या पार्कच्या कामाचा आढावा त्यांनी घेतला. कामात कोणत्या अडचणी येत आहेत का, हे जाणून घेतले आणि त्या दूर करण्याच्या सूचना दिल्या. पार्कचे काम संथगतीने सुरु असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी ठेकेदार आणि पालिकेच्या अधिकार्यांना या कामाची गती वाढविण्याचे निर्देश दिले. पार्कसाठी संरक्षक भिंत आणि जॉंगिग ट्रॅकचे काम तातडीने प्राधान्याने पूर्ण करण्यास सांगितले.परिसराची स्वच्छता करुन ही दोन्ही कामे पूर्ण करु, असे अधिकार्यांनी आमदार नाईक यांना सांगितले.
आमदार नाईक यांनी तुर्भे येथील एनएमएमटीच्या बस डेपोला देखील भेट दिली. परिवहनच्या सेवेत दाखल झालेल्या व्होल्व्हो आणि इतर बसेसची पाहणी केली. व्होल्व्हो बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यापैकी काही कॅमेरे तुटल्याचे तर काही नादुरुस्त झाल्याचे निदर्शनास आल्यावर असे कॅमेरे तात्काळ दुरुस्त करण्याची सूचना त्यांनी केली.
या सीसीटीव्ही कॅमेर्याची काळजी घेण्याची जबाबदारी परिवहनच्या एखाद्या अधिकार्यावर द्यावी. या अधिकार्याने या कॅमेर्यांच्या स्थितीचा वेळोवेळी आढावा घ्यावा, असे निर्देश आमदार नाईक यांनी परिवहनच्या व्यवस्थापनाला दिले.
नादुरूस्त कॅमेरे दुरुस्त करुन परत बसविण्यात येतील, असे परिवहनच्या अधिकार्यांनी आमदार नाईक यांना सांगितले. पामबीच रोड आणि ऍम्युजमेंट पार्कच्या पाहणी दौर्याप्रसंगी आमदार नाईक यांच्यासमवेत स्थानिक नगरसेवक संजय पाटील, तालुकाअध्यक्ष मोहन म्हात्रे, माजी परिवहन समिती सभापती विश्वनाथ पाटील, समाजसेवक प्रमोद पाटील,
माजी नगरसेवक निवृत्ती जगताप, पालिका अधिकारी अनिल नेरपगार, अधिकारी रमेश गुरव आदी उपस्थित होते.
एनएमएमटी डेपोच्या पाहणी दौर्याप्रसंगी परिवहन समिती सभापती गणेश म्हात्रे, परिवहन समिती सदस्य सर्वश्री मोहन म्हात्रे, रामनाथ भोईर, मुकेश गायकवाड, अन्वर शेख, सुरेश पाल परिवहन व्यवस्थापक शिरीष आधारवड आदी उपस्थित होते.