*आ.संदीप नाईक यांच्या प्रश्नाला शासनाचे उत्तर
अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नवी मुंबईतील सारसोळे गावातील ग्रामस्थांना २०० मीटर पर्यंतचा रस्ता करुन मिळावा म्हणून अद्याप वनविभागाकडून कोणताही प्रस्ताव राज्य सरकारला सादर झालेला नाही. मात्र या विभागाकडून तसा प्रस्ताव सादर झाल्यास शासन स्तरावर आवश्यकती कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवार १० डिसेंबर रोजी विधानसभेत एका लेखी प्रश्नोत्तरात दिले.
नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघाचे आमदार संदीप नाईक यांनी नवी मुंबईतील सारसोळे गावातील कोळी बांधवांसाठी
पक्का रस्ता बांधण्याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता. सारसोळे गावातील जेटीवरील पाणी कमी झाल्याने ग्रामस्थांना किनार्यापासून २०० मीटर आत रस्त्याअभावी साचलेल्या गाळातून जावे लागते, यासाठी २०० मीटरपर्यंतचा रस्ता तयार होणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामस्थांनी मागणी केली असून वनविभागाच्या परवानगीअभावी रस्त्याची दुरुस्ती अद्यापही करण्यात आली नाही, हे खरे आहे का? तसेच याप्रश्नी वनविभागाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली आहे अथवा नाही? अशी विचारण त्यांनी केली होती.
याबाबत वनमंत्री मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले की, सदरची जागा ही वनखात्याच्या अखत्यारित मोडत असून त्याला केंद्र शासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र वनविभागाकडून तसा प्रस्ताव सादर झाल्यास शासन स्तरावर आवश्यकती कार्यवाही करण्यात येईल, असेही मुगंटीवार यांनी स्पष्ट केले.