सुजित शिंदे
नवी मुंबई : एकेकाळी राजकीय क्षेत्रात शांत म्हणून गणली जाणार्या नवी मुंबईतील राजकीय वातावरण गेल्या १०-१२ दिवसांपासून ढवळून निघाले आहे. नवी मुंबईतील मातब्बर राजकीय प्रस्थ म्हणून उभ्या महाराष्ट्रात ख्यातनाम असलेले राजकीय नेतृत्व गणेश नाईक आपल्या परिवारासह, समर्थकांसह, कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने महाराष्ट्राच्या राजकारणाचे लक्ष नवी मुंबईकडे लागून राहीले आहे. नवी मुंबईच्या आर्थिक उलाढालीचा कणा म्हणून गणल्या जाणार्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात उलटेच चित्र पहावयास मिळत आहे. बाजार समिती संचालक, व्यापारी, माथाडी, मापाडी व अन्य कर्मचारी मात्र स्थानिक भागात दादांचे (गणेश नाईकांचे) नेतृत्व आम्हाला मान्य असले तरी आम्ही आयुष्यभर पवारसाहेबांचीच माणसे राहणार, पवारसाहेबांना आम्ही सोडणार नसल्याचा सूर उघडपणे आळवू लागली आहे.
गणेश नाईक समर्थकांनी वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात कार्यकर्ता मेळावा आयोजित करून त्यांनी गणेश नाईकांनी पक्षाचा व पदाचा राजीनामा द्यावा आणि नवीन राजकीय निर्णय घ्यावा असा सूर आपल्या भाषणातून आळविला होता. गणेश नाईक भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा नवी मुंबईच्या राजकीय कक्षा ओंलाडून महाराष्ट्राच्या कानकोपर्यात जावून पोहोचली आहे. गणेश नाईकांना विधान परिषद व मंत्रीपद मिळणार तसेच संजीव नाईकांना सिडको अध्यक्षपद मिळणार असा सूरही चावडी गप्पातून आळविला जावू लागला आहे. तथापि नाईक परिवारांकडून कोणतेही स्पष्ट संकेत मिळत नसल्याने अफवांना व चावडी गप्पांना वेग येवू लागला आहे.
बदलत्या राजकीय परिस्थितीत व नवी मुंबईतील अमराठी-परप्रांतिय भाषिकांचा भाजपा कल पाहून राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अधिकांश नगरसेवकांना भाजपामध्ये जाण्याची घाई लागली असल्याचे घडामोडीदरम्यान पहावयास मिळत आहे. नवी मुंबई महापालिका निवडणूकीत शिवसेना-भाजपा युतीचीशक्यता असल्याने विधानसभा निवडणूकीतील शिवसेना-भाजपाच्या मतांची जमाबेरीज पाहता आपला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकीटावर निभाव लागणे अवघड असल्याची भीतीदेखील काही नगरसेवकांकडून उघडपणे व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबईच्या अर्थकारणातील उलाढालीत आणि लोकसंख्येत मुंबई कृषी उत्पन्न बाजार आवारातील घटकांचा सहभाग महत्वपूर्ण ठरला आहे. बाजार आवारातील पाचही मार्केटचा आढावा घेतला असता बाजार आवारातील संचालकांपासून व्यापारी, माथाडी, मापाडी व अन्य कर्मचार्यांची राजकीय चाचपणी केली असता त्यांनी स्पष्टपणे ‘स्थानिक भागात आम्हाला गणेश नाईकांचे नेतृत्व मान्य असले तरी आम्ही शरद पवारांना व राष्ट्रवादी कॉंग्रेसला कदापि सोडणार नसल्याचे’ निक्षुन सांगितले आहे.
बदलत्या राजकीय घडामोडींचा लाभ उचलण्यासाठी नगरसेवक वा त्यांची मातब्बर नेतेमंडळी भाजपामध्ये गेली तरी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापुर, पुणे तसेच अहमदनगर आदी भागातील शरद पवारांना मानणारी मंडळी मात्र पवारांची पर्यायाने राष्ट्रवादी कॉंग्रेसची साथ सोडण्यास कदापि तयार नसल्याचे उघडपणे पहावयास मिळत आहे. बेलापुर मतदारसंघाच्या तुलनेत ऐरोली मतदारसंघात पश्चिम महाराष्ट्रातील संख्या निर्णायक आहे. घणसोली कॉलनी, ऐरोली व अन्य भागात पश्चिम महाराष्ट्रातील टक्का उघडपणे पहावयास मिळत आहे.
बेलापुर मतदारसंघातही ठराविक भागात पश्चिम महाराष्ट्रातील टक्का ठळकपणे पहावयास मिळत आहे. नेरूळ पश्चिम, जुईनगर, सानपाडा, सानपाडा पश्चिम, तुर्भे, सिवूडस आदी भागात पश्चिम महाराष्ट्रातील मंडळी मोठ्या संख्येने वास्तव्य करत आहे. बाजार आवाराशी संबंधित मंडळींचे याच भागात निवासी वास्तव्य आहे. बदलत्या घडामोडीत गणेश नाईकांनी नवीन पर्यायाचा स्वीकार केल्यास पश्चिम महाराष्ट्रातील मंडळी शरद पवारांची पर्यायाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचीच पाठराखण करणार असल्याचे गेल्या १०-१२ दिवसांतील राजकीय घडामोडीदरम्यान स्पष्ट झाले आहे.