अनंतकुमार गवई
नवी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाचे लक्ष सध्या नवी मुंबईतील राजकीय घडामोडींकडे आकर्षित झाले. नवी मुंबईतील मातब्बर राजकीय प्रस्थ गणेश नाईक हे त्यांच्या समर्थंकांसह भाजपामध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना गेल्या १५ दिवसांपासून वेग आला आहे. गणेश नाईक यांच्यांकडून कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली नसली तरी त्यांच्या भूमिकेनंतरच आपली भूमिका ठरविण्याचा नवी मुंबईतील अधिकांश राजकारण्यांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे दबक्या आवाजात चर्चा होत असली अथवा दररोज नवनवीन राजकीय अफवांना खतपाणी भेटत असले तरी नवी मुंबईच्या राजकारणात ‘वेट ऍण्ड वॉच’चाच प्रयोग जोरदारपणे सुरू असल्याचे सुरू आहे.
चार महिन्यावर येवून ठेपलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी सर्वच पक्षांकडून जय्यत तयारी सुरू असतानाच वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहामध्ये नाईक समर्थकांच्या मेळाव्याने नवी मुंबईच्याच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडविली आहे. काही नगरसेवकांनी आपल्या भाषणातून उघडपणे पदाचा त्याग करून पक्ष बदलण्याची गळही नाईकसाहेबांना घालण्याची उघडपणे भूमिका घेतली. येवू घातलेल्या महापालिका निवडणूका प्रथमच पॅनल पध्दतीने होत आहेत. बेलापुरच्या आमदार मंदाताई म्हात्रे आणि ऐरोलीची विधानसभा लढविलेली वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापालिकेत पालिका निवडणूकीच्या माध्यमातून मुसंडी मारणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यातच काही कॉंग्रेसी नगरसेवकांच्या देखील भाजपाच्या आणि शिवसेनेच्या हालचालीदेखील अंतिम टप्प्यात आल्या होत्या. तथापि नाईक राष्ट्रवादी सोडणार, भाजपामध्ये प्रवेश करणार या चर्चांना पेव फुटल्याने सध्या तरी आपल्या आहे त्याच पक्षात राहून नाईकांच्या भूमिकेनंतर आपली भूमिका जाहीर करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
सुरूवातीला १२ डिसेंबरला नाईक हे ना. गडकरींच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. ना. गडकरी आले व गेले पण. आता १८ डिसेंबरला प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. नवी मुंबईत होणार्या चर्चेवर आणि नाईक समर्थकांच्या हालचालीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील वरिष्ठ बारीक लक्ष ठेवून आहे. उद्या ऐरोली विधानसभेकरीता पोटनिवडणूक झाल्यास उमेदवारी कोणाला देण्यापासून नवीन संघटनात्मक बांधणी करताना जिल्हाध्यक्ष पद कोणाला देवून नव्याने मोर्चेबांधणी कशी करता येईल याचीही ब्ल्यू प्रिंट आकाराला येवू लागली आहे. तथापि नाईक जोपर्यत कोणतीही भूमिका स्पष्ट करत नाहीत तोपर्यत आपणही काहीही भूमिका जाहीर न करण्याची भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील वरिष्ठांनी घेतली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.
महापालिका निवडणूक प्रथमच पॅनल पध्दतीने होत असून महिलांना या निवडणूकांमध्ये पूर्वीच्या तुलनेत वाढीव आरक्षण असल्याने प्रस्थापितांच्या अडचणी वाढीस लागल्या आहेत. नाईकांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यास भाजपातील काही जणांनी शिवसेनेत जाण्याची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. उघडपणे कोणी काही बोलत नसले तरी पडद्याआडच्या हालचाली गतीमान आहेत. पॅनल जाहीर होण्याची अनेकांना प्रतिक्षा असून त्यानंतर पुन्हा एकवार आयाराम-गयारामचा शो नवी मुंबईत हाऊसफुल्ल होण्याची दाट शक्यता आहे.