नवी मुंबई : बदलत्या संभाव्य राजकीय घडामोडींनी येत्या ७२ तासामध्ये काय होणार नवी मुंबईत याविषयी तर्क-वितर्क, अफवांनी गगनभरारी घेतली आहे. गणेश नाईकांचा भाजपा प्रवेश हाच एककलमी कार्यक्रम राजकीय चर्चांमध्ये असून ऐरोली वा कोपरखैराणेत प्रवेश करणार याबाबत ठाम पैजांही लागू लागल्या आहेत. गणेश नाईकांनी त्यांच्या समर्थकांसह उद्या भाजपामध्ये प्रवेश केल्यास शरद पवारांच्या नवी मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेसची धुरा आमदार व माथाडी नेते शशिकांत शिंदे, आमदार व माथाडी नेते नरेंद्र पाटील आणि अजित पवारांचे निकटवर्तीय असणारे कडवट समर्थंक नवी मुंबईचे उपमहापौर अशोक गावडे या त्रिमूर्तीलाच सांभाळावी लागणार असल्याचे आता उघडपणे बोलले जावू लागले आहे.
गणेश नाईक वा त्यांच्या परिवारातील कोणाही सदस्यांनी भाजपा प्रवेशाबाबत अथवा राष्ट्रवादी कॉंग्रेसबाबत कोणतेही जाहीर वा सार्वजनिक वक्तव्य केले नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसची वरिष्ठ पातळीवरील मंडळींनीदेखील ‘वेट ऍण्ड वॉच’च्या भूमिकेचा स्वीकार केला आहे. गणेश नाईकांनी भाजपा प्रवेश केल्यास आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस कदापि सोडणार नसल्याचे उपमहापौर अशोक गावडे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. कोपरखैराणेतील रवी पाटील व शंकर मोरे हे नगरसेवकदेखील राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच राहणार असल्याचे बाजार समिती आवारात बोलले जात आहे. सभागृह नेते अनंत सुतार यांनीदेखील गणेश नाईकांनी भाजपात प्रवेश केल्यास आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मातब्बर कार्यकर्त्यांनी व नगरसेवकांनी डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात मेळाव्याचे आयोजन करून पक्ष सोडण्याची गणेश नाईकांना आपल्या भाषणातून गळ घातली होती. त्यानंतरही गणेश नाईकांनी वा त्यांच्या परिवारातील कोणत्याही सदस्यांने राजकीय भूमिकेबाबत आजतागायत जाहीरपणे राजकीय वक्तव्य न केल्याने संभ्रमावस्था कायम आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूकीतील परिवर्तनानंतर आणि मतदारांवर असलेल्या मोदीमय भाजपा प्रभावानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अधिकांश नगरसेवकांच्या मनात आमदार मंदाताईंबद्दल अचानक आदर वाढीस लागला व त्यांच्यासह त्यांच्या वाहनांच्या चकरा गौरवसभोवताली वाढू लागल्या. विष्णूदासमध्ये भाषणातून नाईकसमर्थक असल्याचा टाहो फोडणार्यांपैकी काहींनी अगोदरच मंदाताईसमोर आपल्या निष्ठेची ग्वाही दिलेली असल्याने या नगरसेवकांचे पितळ कसे उघडले याची खासगीत जोरदारपणे चर्चा सुरू आहे. उद्या गणेश नाईकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला तरी नाईकसमर्थक असल्याचा दावा करणारे अधिकांशजण भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
गणेश नाईक भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या तारखांबाबत सोशल मिडीयामध्ये चर्चा होत असून पूर्वी १२ डिसेंबर, त्यानंतर १८ डिसेंबर आणि २१ डिसेंबरला गणेश नाईक भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत गणेश नाईक वा त्यांच्या परिवारांकडून कोणतीही अधिकृत भूमिका अद्यापि जाहीर करण्यात आलेली नाही. नाईकसमर्थक कार्यकर्ते तसेच नगरसेवक ‘ऑफ द रेकॉर्ड’ बरेच काही बोलत असले तरी ‘ऑन रेकॉर्ड’ सांगण्यास कोणीही तयार होत नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार, सुप्रियाताई सुळे, दिलीप वळसेपाटील, छगन भुजबळ हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रथी-महारथी नवी मुंबईतील घडामोडींची माहिती सतत घेत आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील अधिकांश व्यापार्यांची तसेच संचालकांची, माथाडींची शरद पवारांना सोडण्याची आजही मानसिकता नाही. सहकार क्षेष, बँका, पतसंस्था या घटकातील पश्चिम महाराष्ट्रातील मंडळीदेखील पवारांच्याच नेतृत्वाचे आजही गोडवे गात आहे. नेरूळ (प.), सिवूड्स, जुईनगर, सानपाडा, तुर्भे, कोपरखैराणे, घणसोली कॉलनी, ऐरोली व अन्य भागात विखुरलेली पश्चिम महाराष्ट्रातील माणसांचा शरद पवारांकडेच कल असल्याचे उघडपणे पहावयास मिळत आहे.
उद्या नाईकांसमवेत त्यांच्या नगरसेवकांनी, समर्थकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडल्यास आमदार शशिकांत शिंदे, आमदार नरेंद्र पाटील, उपमहापौर अशोक गावडे यांनाच नवी मुंबईतील शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची धुरा सांभाळावी लागण्याची शक्यता आहे. आमदार शशिकांत शिंदेंना सातारच्या पक्षसंघटनेची जबाबदारी असल्याने आमदार नरेंद्र पाटील व उपमहापौर अशोक गावडे याच नावांतून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्वाला नवी मुंबईची राष्ट्रवादी कॉंग्रेस कोणाच्या नेतृत्वाखाली वाढवायची याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. कोपरखैराणे-घणसोली भागातील माथाडींचे निवासी वास्तव्य पाहता आमदार नरेंद्र पाटील यांच्यावर ऐरोली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची तर बेलापुर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील लहानसहान राजकीय घडामोडीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची वरिष्ठ मंडळी बारीक लक्ष ठेवून असून रविवारी वा अन्य वारी यदाकदाचित नाईकांनी भाजपा प्रवेश केल्यास तात्काळ राष्ट्रवादी कॉंग्रेसची नव्याने संघटना बांधणीस सुरूवात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.