* मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा समावेश
* प्रत्येक माध्यमांतील पहिल्या तीन विजेत्यांना आयपॅड बक्षिस
संजय बोरकर
नवी मुंबई : दहावीच्या मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यास सक्षम करणारी एसएससी बोर्डाच्या धर्तीवरील जीवनधारा वॉर्ड सल्लागार समिती-शिक्षण आणि नवी मुंबई शिक्षण संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा सलग ८ व्या वर्षी एसएससी सराव परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. यावर्षी २० डिसेंबर २०१४ ते ११ जानेवारी २०१५ या कालावधीत सराव परीक्षा संपन्न होणार आहे.
दहावीच्या परीक्षेची भीती विद्यार्थ्यांच्या मनातून दूर व्हावी, त्यांच्यातील आत्मविश्वास अधिक वाढावा त्याचबरोबर चांगल्या गुणांनी विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होऊन भविष्यात त्यांना करियरसाठी चांगले क्षेत्र निवडता येता यावे आणि नवी मुंबईची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी या उदात्त भावनेने लोकनेते गणेश नाईक यांच्या प्रेरणेतून एसएससी सराव परीक्षा मागील ७ वर्षापासून यशस्वीपणे घेण्यात येत आहे. या सराव परीक्षेचे आयोजक आ.संदीप नाईक असून सराव परीक्षेचे समन्वयक नवी मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते अनंत सूतार आहेत.
मराठी, इंग्रजी आणि सेमी इंग्रजी अशा तीन माध्यमांमधून परीक्षा देण्याची संधी प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना मिळत होती. मागील वर्षापासून हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांकरीता देखील ही सराव परीक्षा सुरु करण्यात आली
आहे. आजपर्यत या सराव परीक्षेला विद्यार्थ्यांचा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असल्याची, अशी माहिती सराव परीक्षेचे आयोजक आमदार संदीप नाईक यांनी दिली आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या परीक्षेला लाभला असून मराठी, इंग्रजी आणि हिंदी माध्यमातून यावर्षी १३ हजार ८०० विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. २०१३ मध्ये १२ हजार ३१० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यावर्षी २३ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. यंदाच्या परीक्षेत एसएससी बोर्डाकडे १७ क्रमांकाचा अर्ज भरुन दहावीची बाहेरुन परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना देखील सहभागी होता येणार आहे.
सर्व सामान्य कुटूंबातील आणि अनेक गरजू विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्षात महागडे ट्युशन क्लासेस लावणे परवडत नाही, अशा विद्यार्थ्यांना सरावासाठी ही परीक्षा जणू पर्वणीच असते. दहावीच्या बोर्डाप्रमाणेच अर्ज भरून घेणे, हॉल तिकिटांचे वाटप करणे, वेगवेगळ्या सेंटरची निवड करणे, बोर्डाच्या धर्तीवरील आदर्श प्रश्नपत्रिका तयार करणे, नवी मुंबईच्या विविध शाळांमधील त्या-त्या विषयांच्या तज्ज्ञ शिक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासून घेणे अशा प्रक्रिया पार पाडल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना दहावीच्या मुख्य परीक्षे सारख्या वातावरणातच परीक्षा देण्याचा अनुभव मिळतो.
यावर्षी मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांतून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण होणार्या विद्याथ्यार्ंस आयपॅड बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. सध्याच्या स्पर्धात्मक आणि इंटरनेटच्या युगात अधिकाधिक माहिती घेऊन एक पाऊल पुढे राहण्यासाठी बक्षीसरुपाने आयपॅड देण्या मागचा उद्देश आहे. प्रत्येक केंद्रातून प्रथम येणार्या विद्यार्थ्यास प्रत्येकी ५००० रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. परीक्षेत
सहभागी झालेल्या प्रत्येक परीक्षार्थीला गुणपत्रिका तसेच सहभागाबाबतचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
जीवनधारा वॉर्ड सल्लागार समिती-शिक्षण आणि नवी मुंबई शिक्षण संकुलाच्यावतीने आयोजित करण्यात येणारी ही सराव परीक्षा म्हणजे दिशादर्शक ठरली आहे. बोर्डाच्या परीक्षेवियषी असणारी भिती या सराव
परीक्षेतून दूर झाल्याने विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी मागील काही वर्षात वाढली आहे. तर विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद हेच सराव परीक्षेचे यश असल्याची भावना आयोजक संदीप नाईक यांनी व्यक्त केली.