* आमदार संदीप नाईक यांची औचित्याच्या मुद्याद्वारे मागणी
नागपूर : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य शासनाने २.५ अतिरिक्त एफएसआय मंजुरीचा शासन निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबतची अधिसूचना तातडीने प्रसिध्द करावी, अशी मागणी औचित्याचा मुद्दा मांडून बुधवारी राष्ट्रवादी कॉंगे्रसचे ऐरोली विधानसभा क्षेत्रातील आमदार संदीप नाईक यांनी विधानसभेत केली. या धोकादायक इमारतींच्या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले.
नवी मुंबई क्षेत्रातील सिडकोने बांधलेल्या धोकादायक आणि असुरक्षित इमारतींच्या पुनर्विकासासाठी २.५ चटईक्षेत्र निर्देशांक मंजूर करण्याच्या प्रस्तावावर दिनांक ३-९-२०१४ रोजी तत्कालिन आघाडी शासनाकडून जाहीर प्रसिध्दी देण्यात आली होती. त्याचप्रमाणे याबाबतची संचिकाही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी दिनांक ६-९-२०१४ रोजी मंजूर झालेली आहे. तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ४ सप्टेंबर २०१४ रोजी नवी मुंबईतील दौर्यामध्ये व्यक्तीशः या निर्णयाची माहिती जाहीर केली होती. तद्नंतर ६-९-२०१४ रोजी यासंबंधीच्या प्रस्तावाच्या फाईलवर त्यांच्या मान्यतेची मोहर उठविली होती. यानंतर या निर्णयाची अधिसूचना प्रसिध्द करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. ही अधिसूचना छापूनही तयार होती मात्र त्यादरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने ही अधिसूचना प्रसिध्द होवू शकली नव्हती. आता निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्याने ही अधिसूचना शासनाने तात्काळ मंजूर करावी, अशी विनंती आमदार संदीप नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या औचित्याच्या मुद्यामध्ये केली आहे.
सिडकोने विविध उत्पन्न गटांसाठी बांधलेल्या इमारती निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरल्याने अल्प कालावधीतच धोकादायक बनल्या. आत्तापर्यंत या इमारतींमधून छत कोसळून १०० पेक्षा अधिक दुर्घटना झाल्या आहेत. भविष्यात एखादी इमारत कोसळून मोठी जीवितहानी होण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास तातडीने होण्याची गरज आहे. आमदार संदीप नाईक हे सातत्याने यासाठी विधानसभेत पाठपुरावा करीत आहेत. गणेश नाईक यांनी देखील मंत्रीपदावर असताना शासकीय स्तरावर प्रयत्न केले आहेत. संजीव नाईक यांनी खासदार म्हणून आणि महापौर सागर नाईक यांनी देखील पाठपुरावा केलेला आहे. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून २.५ एफएसआयच्या माध्यमातून या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय तत्कालिन आघाडी शासनाने घेतला होता त्याबाबतची अधिसूचना निघण्याची कार्यवाही बाकी आहे.
* आ.संदीप नाईक याच्ंया लक्षवेधीवर आरोग्यमंत्री डॉॅ. दीपक सावंत ंयांचे उत्तर
डेंग्यू, हिवताप, गॅस्ट्रो आदी साथरोगांवर आमदार संदीप नाईक आणि इतर सदस्यांनी बुधवारी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्याला आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी उत्तर दिले. राज्यातील साथीचे आजार नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. या साथरोग नियंत्रणात कोणत्याही अधिकार्याने कसूर केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे डॉ.सावंत यांनी सांगितले. राज्यात साथीचे रुग्ण आढळत आहेत असे सांगून डॉ.सावंत म्हणाले की, स्वाइर्न फ्लू नियंत्रणात आणण्यासाठी २२ सप्टेंबर रोजी ४ लाख टॅमी फ्लू ू गोळया आणि ७४४० टॅमी सिरपची खरेदी करण्यात आली आहे. सध्या राज्यात औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याने एकाही रुग्णाचा मृत्यू टॅमी फ्लू अभावी झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.