नागपूर- केवळ आकसापोटी आमच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निलंबन करण्यात आल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आजपासून हिवाळी अधिवेशनातील कामकाजावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपकडून आमदार यांचे निलंबन मागे घेण्याची शक्यता आहे. याबाबतचा कोणत्याही क्षणी निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वेलमध्ये जाऊन गोंधळ घातल्याचा आरोप करीत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आव्हाड यांचे अधिवेशन संपेपर्यंत शुक्रवारी निलंबन केले होते. मात्र, बहुमतांच्या जोरावर केलेले हे निलंबन अयोग्य असल्याची भूमिका कॉंग्रेस व राष्ट्रवादीने घेतली होती.
आता राष्ट्रवादीने कामकाजावर बहिष्कार घालण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अधिवेशनात राष्ट्रवादीला सामील करून घेण्यासाठी सत्ताधारी भाजप प्रयत्नशील आहे. राष्ट्रवादीने कामकाजावर बहिष्कार घातल्यास सरकारला विधेयके मंजूर करून घेता येणार नाहीत त्यामुळे राष्ट्रवादीने कामकाजात भाग घ्यावा व अधिवेशन सुरळित पार पडावे यासाठी संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी पुढाकार घेतला असून आव्हाड यांचे निलंबन दुपारी १२ पर्यंत मागे घेतले जाण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुष्काळाच्या चर्चेदरम्यान विरोधकांना उत्तर देत असताना शेतकर्यांना दिलेल्या पॅकेजवरून जितेंद्र आव्हाड यांनी वेलमध्ये जाऊन गोंधळ घातल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला आहे. यावेळी त्यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचे समजते. दुष्काळावर चर्चा सुरु असताना सत्ताधारी आणि विरोधक यांच्याच आरोप-प्रत्यारोप सुरु होते. त्याचवेळी विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घालायला सुरुवात केली. सुरुवातीला कामकाज तहकूब करण्यात आले. मात्र, कामकाजाला पुन्हा सुरुवात होताच आव्हाड यांनी वेलमध्ये जाऊन गोंधळ घातला. यादरम्यान कामगारमंत्री प्रकाश मेहता आणि आव्हाड यांच्यात बाचाबाची झाली. आव्हाडांनी त्यावेळी असंसदीय भाषा वापरल्याचा आरोप सत्ताधार्यांनी केला. अखेर संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी जितेंद्र आव्हाड यांचे हिवाळी अधिवेशन पूर्ण होईपर्यंत निलंबन करण्याचा प्रस्ताव मांडला. जो विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मान्य केला होता. जितेंद्र आव्हाड यांच्या निलंबनाविरोधात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी निषेध व्यक्त करीत सभात्याग केला होता.
निलंबनाबाबत आव्हाडांनी भाजपवर आरोप केले होते. मी विधानसभेत काहीही चुकीचा वागलो नाही. असंसदीय भाषा वापरली नाही. विधानसभेत मी कसलाही गोंधळ घातला नाही. मी बसून बोलत होतो. बसून बोललेले भाष्य हा कामकाजाचा भाग नसतो. मी सरकारला वेगवेगळ्या मुद्यांवरून अडचणीत आणले आहे. सभागृहातही आणि सभागृहाबाहेरही. नथुराम गोडसेंचा प्रश्न मीच उपस्थित करून सभागृहात मुद्दा मांडला. त्यामुळे अडचणीत आलेल्या सरकारने बदला घेण्याच्या भूमिकेतून माझे निलंबन केले आहे. त्यामुळेच माझा पक्ष माझ्या पाठीशी उभा राहिला. तरीही काही हरकत नाही तसा ही मी रस्त्यावरीलच कार्यकर्ता आहे. सरकारविरोधातील सभागृहातील लढाई आता रस्त्यावर लढू अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली होती.