संजय बोरकर
नवी मुंबई : मोदी लाटेने देशातील गल्लीपासून ते थेट दिल्लीपर्यतची सर्व राजकीय समीकरणे बदलली गेली. प्रस्थापितांची पाळेमुळे तळागाळापासून उखडली गेली. पण मोदी लाटेला ऐरोली विधानसभा मतदारसंघाला थोपविण्याचे काम केले ते संदीप नाईकांसारख्या युवा नेतृत्वानेच! सोमवारी सकाळपासून ते दुपारपर्यत ऐरोलीतील आमदार संदीप नाईकांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरील गर्दी पाहिल्यावर ऐरोली मतदारसंघातील राजकारणातील सुज्ञ व प्रगल्भ मतदारांचा निर्णय योग्य असल्याची खात्री पटते.
नवी मुंबईच्या विकासाचे स्वप्न आमदार संदीप नाईकांनी पाहिले आहे. श्वासागनिक नवी मुंबईच्या विकासाचे ध्येय उराशी बाळगणार्या या युवा आमदाराला नवी मुंबईकर ‘ओबामा नवी मुंबई’चा या उपाधीने गेल्या काही वर्षापासून ओळखू लागले आहेत. नवी मुंबईच्या विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार करण्याचा बहूमानही संदीप नाईकांच्याच अखत्यारीत आहे. मतदारसंघातील कानाकोपर्यात जनसंपर्क ठेवा, संपर्कात आलेल्याची कामे करत रहा, ओळखीच्या बळावर बेरोजगारांना कंपन्या कारखान्यात रोजगार मिळवून द्या, नागरी समस्यांचे निवारण करताना नागरी सुविधा मिळवून द्या, मग कोणतीही लाट मतपेटीत काहीही आपले वाकडे करू शकत नाही. मतदार कोणत्याही भूलथापेला बळी न पडता विकासकामांची व विकासकामांसाठी अहोरात्र परिश्रम करणार्याचीच पाठराखण करतात, हे युवा आमदार संदीप नाईकांनी उभ्या महाराष्ट्राला विधानसभा निवडणूकीच्या माध्यमातून दाखवून दिले आहे.
आठवड्यातून दोन दिवस, सोमवार ऐरोली व गुरूवार बोनकाडेे जनसंपर्क कार्यालयात नागरिकांना भेटणे, शेवटच्या माणसाचे काम जाणून घेतले जात नाही तोपर्यत कार्यालयातच ठिय्या मांडून बसणे, तसेच संपर्कात आलेल्या माणसांच्या कामाचा पाठपुरावा घेणे ही संदीप नाईकांच्या कामाची ओळख आता नवी मुंबईलाच नाही तर ठाणे व रायगड जिल्ह्यालाही परिचयाची झालेली आहे.
पावसाळा सुरू होण्याअगोदर आजही आमदार संदीप नाईकांकडून पावसाळी पूर्व कामांचा आढावा नियमितपणे घेतला जात आहे. पावसाळ्यात सिडकोच्या गृहनिर्माण सोसाट्यांमध्ये कोणतीही दुर्घटना घडल्यास तात्काळ पाहणी करणे व पदरमोड करून त्यांना मदत करणे. प्रशासकीय मदतीची वाट न पाहता दूर्घटनाग्रस्त सदनिकांधारकांना स्वत:च्या खिशातून मदत करण्यात संदीप नाईकांनी गेल्या नऊ वर्षात सुरूवातीला महापालिकेत व नंतर विधानभवनात वावरताना कधीही हात आखडता घेतलेला नाही.
आमदार संदीप नाईक स्वत: नागरिकांना भेटत असल्याने व आमदार संदीप नाईकांना भेटण्यासाठी कोणत्याही अडथळ्याचा सामना करावा लागत नसल्याने आपला माणूस ही संदीप नाईकांची ऐरोली मतदारसंघातील मतदारांच्या मनात प्रतिमा निर्माण झालेली आहे. बेरोजगारीचा भस्मासूर किमान नवी मुंबईतून हटविण्याचा संकल्प आमदार संदीप नाईकांनी गेल्या काही वर्षापासून केला असून बेरोजगारांना रोजगार हाच एककलमी कार्यक्रम ते प्राधान्याने राबवित आहे. त्यासाठी ऐरोलीतील जनसंपर्क कार्यालयाशेजारीच बेरोजगारांच्या रोजगाराकरीता स्वतंत्र कार्यालय आमदार संदीप नाईकांनी सुरु केले असून रोजगार किती जणांना भेटला व ज्यांना नाही भेटला त्यांना काय अडचण झाली आदी माहिती आमदार संदीप नाईक स्वत: नियमितपणे जाणून घेतात.जनतेला उपलब्ध होणारा, अडीअडचणीला धावून येणारा, सातत्याने जनसंपर्कात राहणारा, पारदर्शक कामकाजाची कार्यप्रणाली अंगिकारणारा अशी आज ऐरोली मतदारसंघातील मतदारांच्या मनात आमदार संदीप नाईकांबाबत प्रतिमा निर्माण झालेली आहे. अर्थात ही प्रतिमा सहजासहजी निर्माण झालेली नाही. त्यामागे अथक परिश्रमही तितकेच कारणीभूत आहेत.