अनंतकुमार गवई
नवी मुंबई : मनविसेच्या नवी मुंबई सांस्कृतिक विभागाकडून नववर्षानिमित्त बनविण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मनविसेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्या हस्ते सोमवारी दुपारी करण्यात आले.
मनविसे सांस्कृतिक विभागाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अमर पाटील यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून मनविसे सांस्कृतिकच्या पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी अभिनव पध्दतीतून दिनदर्शिकेची निर्मिती करण्यात आलेली आहे. या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याच्या वेळी जिल्हाध्यक्ष अमर पाटील यांच्या समवेत शहर अध्यक्ष गिरीराज दरेकर, उपशहर अध्यक्ष उमेश वेताळे, शहर चिटणिस गणेश पालवे, बेलापुर विधानसभा चिटणिस चेतन खैरनार, सनप्रित तुर्मेकर, संदेश डोंगरे, नेरूळ सेक्टर १०चे शाखाध्यक्ष अक्षय वाघुले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबईत मनसेसह मनसेचे विविध सेल कार्यरत असले तरी गटबाजीच्या राजकारणापासून अलिप्त राहत मनविसे सांस्कृतिक विभागाने आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण केलेली आहे. मनसेला अन्य सेलच्या तुलनेत नवी मुंबईत मनविसे सांस्कृतिकने निवडणूका, आंदोलने व अन्य उपक्रमात सर्वाधिक योगदान देवूनही गेल्या अडीच वर्षात मनसे पुनर्रचनेमध्ये स्थानिक नेतेमंडळींनी मनविसे सांस्कृतिकच्या पदाधिकार्यांची सक्षमता असूनही त्यांची उपेक्षाच केलेली आहे. दरवेळी पदे देतो सांगून मनविसे सांस्कृतिकला झुलविण्याचे काम स्थानिक मनसेकारांनी केल्याचे नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळाने जवळून पाहिले आहे.