टोलनाका सुरू झाल्यावर रस्त्यावर लागलेल्या वाहनांच्या रांगा
अनंतकुमार गवई
नवी मुंबई : टोलनाका आणि मनसे ही गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अविभाज्य भाग बनला आहे. टोलच्या माध्यमातून वाहनचालकांची होत असलेली पिळवणूक आणि रस्त्यांची दुर्रावस्था यावर सर्वप्रथम मनसेसुप्रिमो राज ठाकरेंनी प्रकाशझोत टाकून आंदोलनात्मक भूमिका घेत टोलचा झोल महाराष्ट्रीयन जनतेसमोर उघडकीस आणला. खारघरचा टोलनाका सुरू होताच स्थानिक भागातील महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या शिलेदारांनी खळ्ळ-खट्याकचा प्रयोग राबवित टोलबाबत मनसेची भूमिका काय राहणार आहे याचा कृतीतूनच इशारा दिला आहे.
टोलचा मुद्दाच उचलत आमदार प्रशांत ठाकूर यांनी आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदरच काही तास शिल्लक असताना आमदारकीचा व कॉंग्रेस पक्षाचा त्याग करत भाजपामध्ये प्रवेश केला होता. निवडणूकीच्या प्रचारअभियानात भाजपाच्या शिलेदारांनी टोलमुक्त महाराष्ट्राची ग्वाही मतदारांना दिली होती. पण भाजपा आमदाराच्याच मतदारसंघात खारघर टोलनाका सोमवारी मध्यरात्री सुरू करण्यात आला. मनवासेच्या पदाधिकार्यांनी आक्रमक होत टोलबाबत मनसेची भूमिका अद्यापि शमली नसल्याचे पुन्हा एकवार उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या पदाधिकार्यांनी खारघर टोलनाका सुरू झाल्यानंतर अवघ्या काही तासातच आंदोलन केले. जारी केलेल्या अधिसूचनेनंतर दिनांक ६ जानेवारी रोजी मध्यरात्री नाक्यावर टोलवसुली सुरू झाली. पहाटे ४.४५च्या सुमारास मनवासेच्या कार्यकर्त्यांनी टोलचे खळ्ळ खट्याकच केले.
विधानसभा निवडणूकीच्या अगोदर टोलनाका रद्द करण्याच्या प्रकरणावरून प्रशांत ठाकूर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर कॉंग्रेसचा राजीनामा देत भाजपाशी घरोबा केला. भाजपाच्या तिकीटावर आमदार होत प्रशांत ठाकूर आमदार झाल्याने टोलनाका रद्द होण्याविषयी पनवेलकरांसह नवी मुंबईकरांच्या आशा पल्ल्वित झाल्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून वादात अडकलेला खारघरचा टोल नाका अखेर सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आला आहे. टोल वसुलीतून खारघर ते पनवेलपर्यंतच्या रहिवाशांना सूट देण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. सायन पनवेल टोलवेज प्रा. लि. कंपनीच्यावतीनं टोल वसुली करण्यात येणार आहे. पुणे, कोकण आणि गोव्यात जाणार्या आणि त्या मार्गावरून मुंबई-ठाण्यात येणार्या वाहन चालकांना आता आणखी एक टोल भरावा लागणार आहे. तथापि टोलबाबत आमदार प्रशांत ठाकूरांची राजकीय गोची झाली असली तरी शेकाप व मनसेने टोलनाक्याबाबत आपला पाठपुरावा व आक्रमक भूमिका कायमच ठेवली होती.
खारघरचा टालनाका सुरू होताच अवघ्या काही तासातच मनवासेचे लढवय्ये शिलेदार वाहतुक सेनेचे उपाध्यक्ष महेश जाधव, जगदीश खांडेकर, तालुका उपाध्यक्ष मिलिंद खाडे, कार्यकारिणी सदस्य सुधीर नवले आणि सक्रिय कार्यकर्ते महेश सोगे यांनी केले. आधी शांततामय पध्दतीने सुरू केलेल्या आंदोलनाचे नंतर उग्र आंदोलनात रूपांतर झाले. कार्यकर्त्यानी मनसे स्टाईलने उग्र स्वरूप धारण करत टोलनाक्याची तोडफोड करत टोलनाका बंद करण्याचा प्रयत्न केला. याआधीही घंटानाद आंदोलनच्या माध्यमातून मनवासेने टोलला आपला कडवट विरोध दाखविलाच होता. खारघरच्या टोलनाक्यावर मनवासेचे खळ्ळ-खट्याक गाजत असतानाच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या भूमिकेकडे आता महाराष्ट्राचे लक्ष लागून राहीले आहेे.