अनंतकुमार गवई
नवी मुंबई : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी यांच्या वतीने कोकण विभागासाठी दरवर्षी देण्यात येणारा ‘दर्पण पुरस्कार’ या वर्षी लोकसत्ता चे नवी मुंबई विशेष प्रतिनिधी विकास महाडिक यांना जाहीर झाला असून सहा जानेवारी रोजी मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी पोंभुर्ले येथे पंजाबमधील ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ राहणार आहेत. यावेळी राज्यातील अन्य ११ जेष्ठ व गुणवंत पत्रकरांना सन्मानित केले जाणार आहे.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी यांच्या वतीने दरवर्षी राज्याच्या सहा महसुली विभागातील बारा पत्रकारांचा दर्पण पुरस्काराने गौरव केला जातो. पुरस्काराचे हे २२ वे वर्षे आहे. यावर्षे पत्रकार दिनी मंगळवारी सकाळी १०.३० वाजता सिंधुदुर्ग जिल्हयातील पोंभुर्ले देवगड गावी होणार्या या पुरस्कार वितरण समारंभात जेष्ठ पत्रकार बाळकृष्ण पाटील (धरणगाव), राही भिडे (पुणे), दिनकर झिंबे (पुणे), विकास महाडिक (नवी मुंबई), सुर्यभान राजपूत (नाशिक), राजीव पिसे (अमरावती), सावन डोये (नागपूर), राहुल कुलकर्णी (औरंगाबाद), धनंजय राजे (ठाणे), व्यंकटेश देशपांडे (फलटण) दत्तात्रय सपकाळ (देवराराष्टे) अशा १२ पत्रकरांना ‘दर्पण’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.