अनंतकुमार गवई
नवी मुंबई : विधानसभा निवडणूकीत बेलापुर विधानसभा मतदारसंघातून खुद्द शहर अध्यक्ष गजानन काळे व ऐरोली विधानसभा मतदारसंघातून खुद्द शहर उपाध्यक्ष गजाजन खबाले दणदणीत पराभूत झाल्यावर मनसेचे कोठेही अस्तित्व पहावयास मिळाले नाही. पण घणसोली कॉलनीच्या विभाग अध्यक्षपदी सोमवारी मनसेच्या वाशी मध्यवर्ती कार्यालयात सतीश केदारे यांची निवड झाल्याने मनसेचे संघटना बांधणीवर पुन्हा एकवार लक्ष केंद्रीत केल्याचे पहावयास मिळत आहे.
विधानसभा निवडणूकीत मतपेटीतून मिळालेल्या जनाधाराच्या निकषावर नवी मुंबईतील अधिकांश मनसेकारांची विमाने धावपट्टीवर उतरू लागली आहे. विधानसभा निवडणूकीत नवी मुंबईतील दोन्ही मतदारसंघाची जमाबेरीज मनसेची नऊ हजाराचा आकडाही ओंलाडू न शकल्याने मनसेचा जनाधार स्पष्ट झाला आणि स्थानिक पातळीवरील मनसे नेतृत्वाच्या मर्यादाही उघड झाल्या.
सोमवारी वाशी येथील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी शहर सचिव संदीप गलुगडे यांच्या उपस्थितीत सतीश केदारे यांना घणसोली विभाग अध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र दिले. सतीश केदारे हे मनसे स्थापनेपासून एक प्रामाणिक मनसैनिक म्हणून कार्यरत आहेत. गजाजन काळे यांनी उशिरा का होईना घणसोलीतील एका प्रामाणिक मनसैनिकाला न्याय दिला असल्याची प्रतिक्रिया मनसे वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
विधानसभा निवडणूकीत घणसोली कॉलनीतील रहीवाशी असलेले मनसेचे शहर सचिव संदीप गलुगडे हे मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात मनसेची प्रचार यंत्रणा सांभाळण्यात व्यस्त असताना सतीश केदारे यांनी मनसे उमेदवार व शहर उपाध्यक्ष गजाजन खबाले यांची घणसोली कॉलनीतील प्रचाराची धुरा प्रामाणिकपणे व सक्षमरित्या सांभाळली होती. मनसे स्थापनेपासून घणसोली कॉलनी परिसरात सतीश केदारे मनसे संघटनावाढीसाठी परिश्रम करत आहे.