अनंतकुमार गवई
नवी मुंबई : घणसोली कॉलनीतील रहीवाशांची परिस्थिती महापालिका प्रशासनाच्या सुविधांच्या बाबतीत कचरा सफाई मोहीमेविषयी ‘भिक नको पण कुत्रा आवर’ या स्वरूपात झालेली आहे. कचराकुंड्या परिसरातून कचरा नेणार्या वाहनांतून सांडणार्या कचर्याची दुर्गंधीने घणसोली कॉलनीतील रहीवाशी त्रस्त झालेले आहे. नव्याने रूजू झालेले महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी घणसोली कॉलनीत येवून कचरा उचलतानाची पाहणी केल्यास समस्येचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास येईल अशी प्रतिक्रिया घणसोली कॉलनीतील स्थानिक रहीवाशी व मनसेचे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या काही महिन्यापासून घणसोली कॉलनीतील सेक्टर ७ व ९ परिसरात राहणारे घरौंदा व सिम्पलेक्समधील रहीवाशी कचरा दुर्गंधीबाबत उघडपणे नाराजी व्यक्त करू लागले आहेत. घणसोली कॉलनीतील नागरी समस्यांबाबत व तुरळक प्रमाणात मिळणार्या नागरी सुविधांबाबत मनसे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी प्रशासनदरबारी सातत्याने आवाज उठविलेला आहे. मागील काही महिन्यापूर्वी घणसोली कॉलनी व सभोवतालच्या परिसरातील नागरी समस्यांबाबत गलुगडे यांनी विभाग कार्यालयावर नागरी मोर्चाही काढला होता. घणसोली विभाग अधिकार्यांनी पाहणी अभियानाची लेखी पत्रान्वये वेळ देवूनही वेळ न पाळल्याने घणसोली कॉलनीतील नागरी समस्यांकडे नवी मुंबईकरांचे लक्ष वेधण्यासाठी संदीप गलुगडे यांनी विभाग अधिकारी कार्यालयालाच टाळे ठोकले होते.
घणसोली कॉलनीतील घरौंदा व सिम्पलेक्स परिसरात कचर्यांच्या दुर्गंधीने भयावह स्वरूप धारण केले आहे. वाढत्या लोकसंख्येच्या व नागरीकरणाच्या तुलनेत कचराकुंड्याही महापालिकेने न दिल्याने ठिकठिकाणी रस्त्यावरच कचरा पांगलेला दिसून येतो. कचरा घेवून जाण्यासाठी ज्यावेळी जेसीपी व कचरा वाहतुकीचा ट्रक येतो, त्यावेळी होणार्या वाहतुक कोंडीला कचर्याच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याची माहिती संदीप गलुगडे यांनी दिली.
जेसीपीने कचरा व्यवस्थित उचलला जात नसुन काही कचरा रस्त्यावरच तसास पडलेला असतो. कचरा वेळच्या वेळी उचलला जात नसल्याने कचर्याचे साठलेले ढिगारेही पहावयास मिळतात. कचरा वाहतुकीच्या ट्रकमधून कचरा पडतच असल्याने रस्त्यावरच कचरा पडल्याचे दिसून येते. महापालिका प्रशासनाने कचरा समस्येतून घणसोली कॉलनीतून घरौंदावासियांसह सिम्पलेक्सवासियांची सुटका करण्याची मागणी मनसे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी केली आहे.