अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त दिनेश वाघमारे यांचे जानेवारी महिन्याच्या सर्वसाधारण सभेप्रसंगी महापौर सागर नाईक यांनी स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी, सभागृह नेते अनंत सुतार, विरोधी पक्ष नेता सौ. सरोज पाटील यांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ सभागृहात सर्व लोकप्रतिनिधींच्या वतीने स्वागत केले.
जानेवारी महिन्याच्या सर्वसाधारण सभेत मध्य रेल्वे, मुंबई उपनगरीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती यावर नवी मुंबई महानगरपालिकेचे स्विकृत नगरसेवक साबू डॅनियल यांची महापालिका प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यास सर्वसाधारण सभेने सर्वानुमते मंजूरी दिली. यापुर्वीही या समितीवर त्यांनी सदस्य म्हणून काम केलेले असल्याने त्यांच्याकडून समिती सदस्य म्हणून अधिक चांगल्या प्रकारचे काम होईल असा विश्वास महापौर सागर नाईक यांनी व्यक्त केला आहे.
त्याचप्रमाणे कौपरखैरणे विभागात महापे गावासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जलवाहिनीवरुन थेट पाणीपुरवठा कऱण्यात येतो. त्याठिकाणी एम.आय.डी.सी. मार्फत वेळोवेळी घेण्यात येणार्या शटडाऊनमुळे पुन्हा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी साधारणत: दोन दिवसांचा कालावधी लागतो. महापे गांव उंचावर असल्याने या भागातील काही ठिकाणी पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. यावर उपाययोजना करीत महानगरपालिकेच्या वतीने महापेगांव स्मशानभूमीच्या आवारातील मोकळ्या जागेत १ द.ल.लि. क्षमतेचा भूस्तरीय जलकुंभ व ०.५ द.ल.लि. क्षमतेचा उच्चस्तरीय जलकुंभ बांधण्याच्या रु. २ कोटी २२ लक्ष १६ हजार ९२९ रुपयाच्या अंदाजपत्रकीय खर्चास बुधवारी महापौर सागर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वासाधारण सभेने सर्वानुमते मंजूरी दिलेली आहे. यामध्ये भूमीगत व उच्चस्तरीय जलकुंभ बांधणे, २०० मी. व्यासाची डी.आय. जलवाहिनी पुरविणे व टाकणे, व्हॉल्व बसविणे, चेंबर्स बांधणे, खोदकाम करणे, पंपींग मशिनरी पुरविणे व बसवणे व विद्युत विषयक कामांचा समावेश आहे. यामुळे महापे गावातील नागरिकांना शटडाऊन काळात भेडसावणार्या पाणी समस्येपासून दिलासा मिळणार आहे.