अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १२ मधील श्री.गणेश रामलीला मैदानावर सुरू असलेला आगरी-कोळी महोत्सव गेल्या काही दिवसामध्ये गर्दीचा उच्चांक करू लागला आहे. लहान बालकांपासून वयोवृध्दांपर्यत सर्वच जण आगरी-कोळी महोत्सवात सहभागी होवू लागल्याने या महोत्सवामध्ये गर्दीचा कुंभमेळाच जमल्याचे पहावयास मिळत आहे.
आखिल आगरी-कोळी समाजप्रबोधन ट्रस्टच्यावतीने सध्या नेरूळ सेक्टर १२मध्ये आगरी-कोळी महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. नवी मुंबईत बाहेरून वास्तव्यास आलेल्यांना स्थानिक आगरी-कोळी समाजाच्या चालीरितींचे, आचार-विचारांचे, संस्कृतीचे दर्शन व्हावे यासाठी सिडकोचे माजी संचालक व कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणिस नामदेव भगत यांनी आखिल आगरी-कोळी समाजप्रबोधन ट्रस्टच्यावतीने गेल्या काही वर्षापासून सातत्याने आगरी-कोळी महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवात प्रवेश केल्यावर बच्चे मंडळी सर्वप्रथम उजव्या हाताला वळसा मारून थेट खेळण्याकडेच पालकांना घेवून जातात. याठिकाणी दररोज विविध मनोरंजनाचे कार्यक्रमही सादर केले जात असल्याने नोकदारवर्ग कामावरून घरी आल्यावर त्वरीत परिवारासह आगरी-कोळी महोत्सवात सहभागी होत असल्याचे पहावयास मिळते. विविध प्रकारची मच्छि खाण्यासाठी खवय्यांना हा महोत्सव मेजवानीच ठरू लागला आहे. महोत्सवात सहभागी होणारी भाविक मंडळी दररोज न चुकता एकवीरा आईचे न चुकता भक्तिभावाने दर्शन घेत आहेत. बच्चेकंपनीना माफत दरात खेळण्याची सुविधा महोत्सवाचे आयोजक नामदेव भगत यांनी उपलब्ध करून दिली आहे. खेळण्यांच्या स्टॉलवर नामदेव भगत व त्यांच्या स्वंयसेवकांचे जातीने लक्ष असून गेल्या तीन वर्षापासून महोत्सवातील विविध खेळांचे दर तेवढेच असल्याचे दिसून येते. एकवेळ महोत्सवात सहभागी होवून माफक दर ठेवा एवढेच नामदेव भगत यांनी खेळणी चालकांना सांगितल्याचे खेळणी चालकांकडून माहिती मिळते.
महोत्सवात कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा महिला वर्गाची छेडछाड होवू नये म्हणून नामदेव भगत यांनी स्वंयसेवकांचे स्वतंत्र जाळे तयार केले आहे. नेरूळ पोलीस ठाण्याचे पोलीसही महोत्सवातील गर्दीवर लक्ष ठेवून असतात. आगरी-कोळी महोत्सवात सध्या जमणारा गर्दीचा महापुर पाहता अखेरच्या दिवशी ११ जानेवारीपर्यत महोत्सवातील सहभागींचा आकडा सव्वा लाखाचा टप्पा पार करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बच्चे कंपनीपासून ते आबालवृध्दांपर्यत सर्वांनाच आगरी-कोळी महोत्सवाने आकर्षित केल्याचे दिसून येते. महोत्सव कालावधीत घरातील कर्ती मंडळी सहपरिवार महोत्सवातील मच्छिवर ताव मारत असल्याने रात्रीच्या स्वंयपाकातून सुटका झाल्याचे तुर्तास समाधान महिला वर्गाकडून व्यक्त केले जात आहे.