अनंतकुमार गवई
नवी मुंबई : शिवसेेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यावर या पदासाठी दावेदार म्हणून अनेक नावे शिवसैनिकांमध्ये चर्चिली जात असली तरी शिवसेना उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे हे या पदासाठी सर्वात प्रबळ व सक्षम दावेदार मानले जात आहेत. परंतु तोंडाशी आलेला घास नियतीने हिरावून नेण्याची परंपरा ऍड. गायखेंच्या बाबतीत गेल्या काही वर्षात सातत्याने घडत असल्याने आता तरी जिल्हाप्रमुख पद ऍड. गायखेंना हुलकावणी देणार नाही ना, असा चिंतेचा सूर शिवसैनिकांकडून आळविला जात आहे.
शिवसेनेमध्ये गेल्या तीन दशकापासून ऍड. मनोहर गायखे कार्यरत असून विभागप्रमुखपदापासून त्यांनी नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख पदापर्यत मजल मारली आहे. शिवसेनेच्या अन्य सेलमध्ये ऍड. गायखेंनी सक्षमपणे योगदान दिलेले आहे. बेरोजगारांना रोजगार हा एककलमी कार्यक्रम ऍड. गायखे सातत्याने राबवित असून त्यांनी आरोग्य व शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत.
निष्ठावंत, कडवट व मातोश्रीच्या विश्वासातले शिवसैनिक असतानाही ऍड. गायखेंना नियतीने सातत्याने हुलकावणी दिल्याचे गेल्या काही वर्षात मिळालेले नाही. प्रत्येक वेळी ऍड. गायखेंचे नाव चर्चेत येते व सर्वकाही फायनल झाल्याचे संकेत निर्माण झालेले असतानाच प्रत्यक्षात शेवटच्या क्षणी भलतेच घडते. लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडनूकीत तिकीटवाटपात ऍड. गायखेंचे नाव शेवटपर्यत आघाडीवर होते. पण घडले भलतेच. राज्यसभा व विधानपरिषद निवडणूकीतही ऍड. गायखेंच्या नावाची फक्त चर्चाच जोरदार होते. विजय चौगुले शिवसेनेत येण्याअगोदर ऍड. गायखेंच्याच नावाची जिल्हाप्रमुख पदाकरीता जोरदार चर्चा होती. त्यामुळे ऍड. गायखेंच्या नशिबी नियती खो घालत असल्याचे शिवसैनिकांकडून उघडपणे बोलले जात आहे. जिल्हाप्रमुख पदावर नव्याने शिवसेनेत आलेल्यांना वा आयाराम-गयारामांना संधी देण्याऐवजी ऍड. गायखेंसारख्या संघटनेशी प्रामाणिक व मातोश्रीच्या विश्वासातील शिवसैनिकाला संधी देण्याचा सूर शिवसेनेच्या नवी मुंबई छावणीत आळविला जात आहे.