* दोनच दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांना दिले लेखी निवेदन
* शनिवारी सांयकाळी जनजागृतीसाठी स्वाक्षरी अभियान
अनंतकुमार गवई
नवी मुंबई : जुईनगर परिसरातून वाहणार्या नाल्यात एमआयडीसीतील कंपन्या-कारखान्यातून सोडल्या जाणार्या घातक रासायनिक द्रव्यामुळे रहीवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून याबाबत सानपाडा-जुईनगर बचाव समितीचे सर्वेसर्वा विजय साळे यांनी दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदनातून समस्येचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. तथापि स्थानिक रहीवाशांमध्येही जनजागृती व्हावी याकरीता शनिवार दि. १० जानेवारी व रविवार दि. ११ जानेवारी रोजी स्वाक्षरी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी सांयकाळी ४ ते ८ आणि रविवारी सांयकाळी ५ ते ८ या वेळेत सानपाडा-जुईनगर बचाव समितीच्या वतीने हे स्वाक्षरी अभियान राबविले जाणार असल्याची माहिती विजय साळे यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात, सन १९९९पासून सानपाडा व जुईनगर परिसरातील लोकवस्ती ७० ते ८० हजाराने वाढली आहे. एमआयडीसीतून जुईनगर परिसरात येणार्या नाल्यामुळे रहीवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. रासायनिक कंपन्या-कारखान्यातील रासायनिक, प्रदूषित सांडपाण्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर टांगती तलवार निर्माण झाल्याची व्यथा विजय साळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर दोन दिवसापूर्वीच कथन केली आहे. स्वाक्षरी अभियानातून जनसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी आणि रासायनिक पाण्यामुळे निर्माण झालेल्या जनप्रक्षोभकांची प्रशासनाला कल्पना यावी याकरीता स्वाक्षरी अभियानाचे आयोजन केले असल्याची माहिती विजय साळे यांनी दिली.