अनंतकुमार गवई
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यास सुरूवात केली असून आज त्यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ.संजय पत्तीवार आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक परोपकारी यांचेसमवेत नेरूळ व बेलापूर येथील महानगरपालिकेच्या नवीन रूग्णालयांस भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. याप्रसंगी अतिरिक्त शहर अभियंता सुरेंद्र पाटील, सह शहर अभियंता जी.व्ही. राव आणि संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सद्यस्थितीत या रूग्णालयांत बाह्यरूग्ण सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून संपूर्ण रूग्णालयीन सेवा लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक वैद्यकीय उपकरणांची व मनुष्यबळाची पुर्तता करणे, औषधसाठा उपलब्ध करून घेणे तसेच औषध भांडार अद्ययावत करणे आदी कामे विनाविलंब करण्याचे निर्देश त्यांनी दिले. रूग्णालयातील लहान लहान बाबींची पाहणी करताना त्यांनी त्याठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार्या सुविधांची सांगोपांग माहिती घेतली.
नवी मुंबईकर नागरिकांना समाधानकारक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी महापालिका कटीबध्द असून नवीन रूग्णालये लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने गतीमान कार्यवाही करण्यात येईल असे महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी यावेळी सूचित केले.