अनंतकुमार गवई
नवी मुंबई : आज आधुनिक व उच्च तंत्रज्ञानाचा नागरी सेवासुविधांमध्ये वापर करणारे नवी मुंबई हे भारतात आघाडीचे शहर असून क्रीडाक्षेत्रातही असाच नावलौकिक मिळविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध २१ प्रकारचे क्रीडा उपक्रम राबविले जात आहेत. वेगवेगळ्या स्पर्धांना मिळणारा प्रत्येक वर्षीचा वाढता प्रतिसाद बघता पालक, मुलांमध्ये खेळांबद्दल जागृती निर्माण होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत नवी मुंबईचे महापौर सागर नाईक यांनी नवी मुंबई क्रीडानगरी म्हणूनही नावाजली जाईल असा विश्वास व्यक्त केला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने वाशी येथे एन.एम.एस.ए. स्पोर्टस् क्लबच्या तरण तलावात १० व ११ जानेवारी रोजी संपन्न होत असलेल्या नवी मुंबई महापौर चषक जलतरण स्पर्धेच्या उद्घाटन समारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
अनेकदा गुणवत्ता असूनही खेळाडूंना कौटुंबिक परिस्थितीमुळे उच्चस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होता येत नाही, अशा खेळाडूंकरीता महानगरपालिकेमार्फत मदत करण्यासाठी धोरण तयार करण्याची सूचना महापौरांनी याप्रसंगी क्रीडा विभागास दिली तसेच मागील वर्षीच्या ३१० सहभागी स्पर्धकांमध्ये यावर्षी ६०० हून अधिक म्हणजे दुपटीने स्पर्धक सहभाग वाढल्याबद्दल सर्वांचेच अभिनंदन केले.
याप्रसंगी महापौर सागर नाईक यांचेसमवेत उपमहापौर अशोक गावडे, विरोधी पक्षनेता सौ.सरोज पाटील, स्पर्धेचे निमंत्रक क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती शंकर मोरे, नगरसेवक वैभव गायकवाड व सौ.शिल्पा मोरे, क्रीडा विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार व सहा.आयुक्त दिवाकर समेळ, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, एन.एम.एस.ए. संस्थेचे सहसचिव अरूण पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते जलतरणपटू गोकुळ कामथ, राष्ट्रीय पंच संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
ठाणे जिल्हास्तरीय नवी मुंबई महापौर जलतरण स्पर्धेला आज अत्यंत उत्साहात प्रारंभ झाला असून ८, १०, १२, १४, १७ वर्षाआतील मुले व मुली तसेच खुला गट पुरूष व महिला अशा सहा गटात दोन दिवस या जलतरण स्पर्धा संपन्न होत आहेत. उद्या रविवार दि.११ जाने.२०१५ रोजी सायं.५ वा. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार असून याप्रसंगी गुणवंत जलतरणपटूंना प्रोत्साहित करण्यासाठी क्रीडारसिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित रहावे असे आवाहन क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती शंकर मोरे यांचे वतीने करण्यात आले आहे.