अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गतवर्षी प्रमाणेच याही वर्षी नवी मुंबई महापौर चषक जलतरण स्पर्धा २०१४-१५ दि. १० व ११ जानेवारी २०१५ या कालावधीत नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशनच्या जलतरण तलावात संपन्न होत आहेत.
या स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून यामध्ये ८ वर्षाआतील मुले व मुली, १० वर्षाआतील मुले व मुली, १२ वर्षाआतील मुले व मुली, १४ वर्षाआतील मुले व मुली, १७ वर्षाआतील मुले व मुली तसेच खुला गट पुरुष व महिला असे सहा गट आहेत. ठाणे जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रत्येक गटासाठी स्वतंत्र ३ रोख पारितोषिके व स्मृती चिन्हे अशी एकुण २ लाख रुपयांची भरघोस पारितोषिके वितरीत करण्यात येणार आहेत.
१० जानेवारी रोजी सकाळी ९.३० वा. नवी मुंबईचे महापौर सागर नाईक यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ होणार असून दि. ११ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वा. महापौरांच्या हस्ते या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे. याप्रसंगी उपमहापौर अशोक गावडे, स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, सभागृह नेता अनंत सुतार, विरोधी पक्ष नेता सौ. सरोज पाटील आणि इतर पदाधिकारी आणि इतर महापालिका पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका उपस्थित राहणार आहेत.
नवी मुंबईतील जलतरणपट्टूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारी व जिल्हा स्तरावर स्वत:मधील क्षमता सिध्द करण्याची संधी देणारी नवी मुंबई महापौर जलतरण स्पर्धा ही मानाची समजली जात असून यामधील सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडाप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती शंकर मोरे व समिती सदस्य यांच्या वतीने करण्यात येत आहे.