अनंतकुमार गवई
नवी मुंबई : सारसोळे गावासह नेरूळ सेक्टर सहा परिसरात कायदा व सुव्यवस्थेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार्या घटना नेहमीच घडत असल्याने या परिसराला चोरट्यांचे माहेरघर संबोधले जात आहे. शुक्रवारी पहाटे घरात चोरी करण्यास आलेल्या चोरट्याने जागे झालेल्या पती-पत्नीवर वार करून त्यांना जखमी करण्याची घटना सारसोळे गावात नेरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. ती पत्नी महिला पोलिस असून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात सीबीडी येथे कामाला आहे.
सारसोळे गावात व नेरूळ सेक्टर सहा परिसरात चोर्यांच्या घटना नेहमीच घडत असतात. सारसोळे गावात शुक्रवारी पहाटे घरात चोरीच्या हेतूने घुसलेल्या चोरट्यांने महिला पोलिसासह तिच्या नवर्याला गंभीर जखमी केल्याने ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकवार सारसोळे गाव प्रकाशझोतात आले आहे.
सारसोळे गावातील गांवदेवी मंदीराजवळ राहणार्या रविंद्र पांडूरंग पाटील यांच्या घरात ही घटना घडली. गांवदेवी मंदीराजवळ ईमारतीचे काम सुरू असून तळाशीच रविंद्र पाटील राहतात. पहाटे चार-साडे चार वाजण्याच्या सुमारास घरात काहीतरी चाहूल लागल्याने रविंद्र पाटील जागे झाल्याने घरात चोर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोराने रविंद्र पाटील यांनी आरडाओरड करू नये म्हणून त्यांच्यावर हल्ला डोक्यावर डोक्यावर, हातावर, पायावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात चोराने रविंद्र पाटील यांची पत्नी विनंती रविंद्र पाटील यांच्याही हातावर वार करून त्यांनाही जखमी करून पलायन केले. सौ. विनंती पाटील या महिला पोलिस असून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातच त्या कार्यरत आहेत.
हल्लेखोर चोरटा घरात एकटा असला तरी घराबाहेर अजून चार ते पाच त्याचे साथीदार उभे असल्याची माहिती ग्रामस्थांकडून दिली जात आहे. जखमी अवस्थेही रविंद्र पाटील यांनी फोन करून भावाला बोलवून घटनेची कल्पना दिली. जखमी अवस्थेतच पाटील यांनी आपल्या जखमी पत्नीसह उपचारासाठी नेरूळ सेक्टर सहामधील सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. सुश्रुषा रूग्णालयात पाटील पती-पत्नीवर उपचार सुरू आहेत. पोलिस कर्मचार्यावर चोरट्याने हल्ला केल्याने पोलिसांनी तात्काळ दखल घेवून तपासास सुरूवात केल्याचे पहावयास मिळाले. नेरूळ पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह एसीपी व अन्य पोलिस अधिकार्यांनी सुश्रुषा रूग्णालयात धाव घेवून पाटील पती-पत्नीची चौकशी केली.
सारसोळे गावातील युवा सामाजिक कार्यकर्ते व कोलवानी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी गेल्याच महिन्यात पोलीस आयुक्तांना व नेरूळ पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना लेखी निवेदन देवून नेरूळ सेक्टर सहा परिसरासह इतरत्र गस्त घालण्याची परवानगी मागितली होती. तथापि पोलिसांनी याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. नेरूळ सेक्टर सहा परिसर व सारसोळे गावातील वाढत्या चोर्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गस्त घातली गेल्यास चोर्यांना आळा बसण्याची शक्यता स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त केली जात आहे.