अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नेरूळमधील श्री. गणेश रामलीला मैदानावर मोठ्या उत्साहात साजरा होत असलेल्या डॉ. उमेश कामतेकर यांनी सादर केलेल्या ‘हा खेळ लावण्यांचा’ हा लावणी व भावगीतांचा सोहळा पाहण्यासाठी नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
आखिल आगरी-कोळी समाजप्रबोधन ट्रस्टच्यावतीने सध्या नेरूळ सेक्टर १२मध्ये आगरी-कोळी महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. काल, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने लोकांनी आपल्या कुंटूंब व मित्र परिवारासह या महोत्सवास भेट देवून मनमुराद आनंद लुटला. एकाहून एक सरस लावण्या व भावस्पर्शी गीतावर उपस्थित प्रेक्षक शिट्ट्या व टाळ्या वाजवून उत्स्फूर्तपणे कलाकारांना दाद देत होते. ‘बुगडी माझी सांडली ग जाता सातार्याला’ व ‘मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा’ या गाण्यावर लहान मुलांसह माणसांचे पाय थिरकत होते.
नवी मुंबईतील बालकलाकारांना आपली उपजत कला सादर करण्याची संधी या आगरी-कोळी महोत्सवात मिळत असल्याने मोठ्या संख्येने कलाकार आपली कला या महोत्सवात सादर करत असल्याची माहिती आखिल आगरी-कोळी समाजप्रबोधन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष नामदेव भगत यांनी दिली. रविवारीदेखील स्थानिक कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम, नकला, गाणी सादर करून रसिकांची मने जिंकली.
या महोत्सवात स्थानिक आगरी-कोळी संस्कृतीचे दर्शन नवी मुंबईकरांना पहावयास मिळत आहे. याशिवाय ज्ञान-विज्ञान प्रदर्शन, खवय्यांकरीता आगरी-कोळी पध्दतीचे स्वादिष्ट व रूचकर जेवणाचीही सोय इथे उपलब्ध आहे. हा आगरी-कोळी महोत्सव ११ जानेवारीपर्यत नवी मुंबईकरांना उपलब्ध असून इथे सहकुटूंब भेट देवून महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन नामदेव भगत यांनी केले आहे.