वेश्याव्यसाय करणार्या ८ महिलांना अटक
अनंतकुमार गवई
नवी मुंबई : जुईनगर रेल्वे स्थानक आवारात गेल्या काही महिन्यापासून खुलेआमपणे चालणारा वेश्याव्यवसाय शिवसैनिकांनी व शिवसेनेच्या रणरागिंणीनी पुढाकार घेवून उधळून लावला आहे. वेश्याव्यवसाय करणार्या ८ महिलांना नेरूळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गोंधळात देहविक्री करणार्या आणखी काही महिला पलायन करण्यात यशस्वी झाल्या आहेत.
जुईनगर रेल्वे स्थानक परिसरात पूर्वेच्या बाजूला रिक्षा स्टॅण्ड परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून खुलेआमपणे वेश्या व्यवसाय सुरू होता. रेल्वे स्थानक जाणार्या व बाहेर येणार्या प्रवाशांना शुक शुक करून, अश्लिल इशारे करून, चित्रविचित्र चाळे करून तर कधी शरीराच्या भागाचे प्रदर्शन करून वेश्या व्यवसाय करणार्या महिला आकर्षित करून घेण्याचा प्रयास करत असत. जुईनगर रेल्वे स्थानक परिसरात सकाळी ११ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यत वेश्या व्यवसाय करणार्या महिला उभ्या असलेल्या पहावयास मिळत. दुपारच्या वेळी मानखुर्द-गोवंडीच्या महिला तर रात्रीच्या वेळी तुर्भे व सभोवतालच्या परिसरात महिला वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती धरपकड केलेल्या महिलांनीच चौकशीत पोलिसांना दिली.
गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या या वेश्या व्यवसायामुळे अन्य रेल्वे स्थानकाकडे ये-जा करणार्या महिलांनाही इतर लोकांच्या अश्लिल नजरांचा सामना करावा लागत असे. या त्रस्त महिलांनी शिवसेनेचे जुईनगरचे शाखाप्रमुख शैलेश भोईर यांच्याशी संपर्क साधल्यावर जुईनगर रेल्वे स्थानकात चालणारा वेश्या व्यवसाय उधळून लावण्याची रणनीती आखण्यात आली. सोमवारी दि. १९ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता काही शिवसैनिकांनाच डमी ग्राहक बनवून या देहविक्रीचा व्यवसाय करणार्या महिलांकडे पाठविण्यात आले. आकडा ठरल्यावर व देहविक्रीचा वेश्या व्यवसाय करणार्या महिला याच असल्याची खात्री झाल्यावर शिवसैनिकांनी व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या वेश्यांची धरपकड केली. या गोंधळात काही वेश्या पळून जाण्यात यशस्वी झाल्या.
शाखाप्रमुख शैलेश भोईर, शाखाप्रमुख स्वानंद शिंदे, महिला आघाडीच्या उपशहरसंघठक संगीता शिंगाडे, विभाग संघठक सुनिता माने, शाखासंघठक नीता विसपुते यांच्यासह युवा सेनेच्या पदाधिकार्यांनी, शिवसैनिकांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या व्यूहरचनेत पुढाकार घेत जुईनगर रेल्वे स्थानक आवारात चालणारा वेश्या व्यवसाय उधळून लावला. ८ महिलांना घटनास्थळी पोलीस बोलावून नेरूळ पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. नेरूळ पोलीस ठाण्याचे एपीआय ढोम अधिक तपास करत आहे. शिवसैनिकांनी वेश्या व्यवसाय उधळून लावल्याने जुईनगर-सानपाडा परिसरात दिवसभर याचीच चर्चा सुरू आहे.