नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या मंगळवारी महापौर सागर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंजूरीसाठी सादर केलेल्या नागरी सुविधाविषयक प्रशासकीय प्रस्तावांस सर्वानुमते मंजूरी मिळाली.
यामध्ये – बोनकोडे गांव स्मशानभूमीच्या नुतनीकरण कामास मंजूरी मिळाली असून ८३८ चौ.मी. क्षेत्रफळाची ग्रामपंचायतकालीन स्मशानभूमी नवीन स्वरुपात वैशिष्ट्यपूर्ण सुविधांसह बांधण्यात येत आहे. यात आरसीसी बर्निंग शेड बांधणे, संरक्षक भिंतीची दुरुस्ती करणे व जीआय शीट लावून उंची वाढविणे, लॅकर कोटेड इंटरलॉकींग पेव्हर ब्लॉक बसवून परिसराची सुधारणा करणे, मृत लहान मुलांसाठी दफनभूमी तयार करणे, आर.सी.सी. स्टोअर रुम बांधणे व वॉचमन केबीन बांधणे अशा रु. १ कोटी ५८ लक्ष ९२ हजार अंदाजपत्रकीय रक्कमेच्या विविध कामांस कामांस मंजूरी देण्यात आली.
त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील काही आरोग्य सुविधा आऊटसोर्सींगद्वारे उपलब्ध करुन देण्याच्या कार्यप्रणालीस मंजूरी देण्यात आली. सद्य:स्थितीत महानगरपालिकेच्या वतीने वाशी येथील सार्वजनिक रुग्णालय व ४ माता बाल रुग्णालयांव्दारे आंतररुग्ण सुविधा उपलब्ध करुन दिली जात असून लवकरच नेरुळ व ऐरोली येथील माता बाल रुग्णालयांचे सार्वजनिक रुग्णालयात रुपांतरण होत असल्याने व बेलापूर येथे नवीन माता बाल रुग्णालय कार्यान्वित होणार असल्याने याठिकाणी एक्सरे, अल्ट्रा सोनोग्राफी, सिटीस्कॅन, एम.आर.आय., पॅथॉलॉजी व त्यासारख्या निदानात्मक सुविधा, रक्तपेढी सुविधा व रक्तसंक्रमण सारख्या आरोग्य सेवा, रुग्णवाहिका/शववाहिका सेवा, कॅन्टीन/आंतररुग्ण भोजन/लिनन व लॉन्ड्री/रुग्णालयीन साफसफाई अशा सेवा तसेच जैविक कचरा विल्हेवाट व डायलेसीस सुविधा अशा विविध आरोग्य सुविधा आऊटसोर्सींगव्दारे उपलब्ध होण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून निविदा/स्वारस्याची अभिव्यक्ती मागविण्यास प्रशासकीय मंजूरी देण्यात आली.
तसेच नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१५ करीता प्रति मतदार रु. ६५ इतका संभाव्य खर्च विचारात घेऊन प्रभाग रचनेकरीता मतदान यादीकरीता, मतदान यंत्राकरीता, मानधन व भत्ते, मतदानकेंद्रे उपलब्धता व त्यावर पुरवावयाच्या सोयी सुविधा आणि साहित्य सामुग्री, वाहतूक, छपाई, मतदार जागृती अभियान, प्रशिक्षण, मतमोजणी, कार्यालयीन बाबी, संगणकीकृत बाबी, राज्य निवडणूक आयोगाकडे द्यावयाचे अंशदान, संकीर्ण बाबी व इतर आवश्यक बाबींकरीता एकुण रु. ५ कोटी ३९ लक्ष इतक्या अंदाजीत निवडणूक खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकारी व अधिकारी-कर्मचारी यांना नागरी प्रशासनाचे प्रशिक्षण देणार्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई या संस्थेस महानगरपालिकेच्या गौरव म्हात्रे कलाकेंद्रातील ७ हजार चौ.फुट जागा प्रति चौ.फुट दरमहा रु. २ प्रमाणे भाडे आकारणी करुन ५ वर्षांच्या कालावधीकरीता महानगरपालिकेच्या कर्मचार्यांना संस्थेच्या कोणत्याही शाखेमध्ये एल.एस.जी.डी., एल.जी.एस., डी.एफ.एम., डी.ई.एम., प्रि.एस.आय., एस.आय. अशा अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के सवलत देण्याच्या अटीवर उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली.